धमकीपत्राची आंदोलकांकडून होळी
By admin | Published: July 1, 2017 01:02 AM2017-07-01T01:02:47+5:302017-07-01T01:02:47+5:30
धमकीपत्राची आंदोलकांकडून होळी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘पुजारी हटाओ, मंदिर बचाओ,’ ‘अंबामाता की जय’च्या घोषणा देत श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलनातील कार्यकर्त्यांना पाठविण्यात आलेल्या धमकीच्या पत्राची शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात होळी करण्यात आली. तसेच या प्रकरणाला जातीयवादाचा रंग देणाऱ्या पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.
अंबाबाईला घागरा-चोली नेसविल्यापासून गेल्या वीस दिवसांपासून कोल्हापुरात ‘अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ’ आंदोलन सुरू झाले आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत श्रीपूजक अजित ठाणेकर यांना मारहाण झाल्यानंतर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांना मंदिर प्रवेश बंदी केली आहे.
या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २८) आंदोलनातील कार्यकर्ते दिलीप पाटील यांना दिलीप देसाई, सचिन तोडकर यांच्यासह तुम्हीही अंबाबाई मंदिर आंदोलनातून बाजूला व्हा; अन्यथा पानसरेंप्रमाणे बंदोबस्त करू, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. दुसरीकडे, पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने सोशल मीडियावर व्हीडिओ पाठवून या प्रकरणाला ब्राह्मणविरोधी जातीयवादाचा रंग दिला आहे. या दोन्ही घटनांचा
यावेळी निषेध करण्यात आला व धमकीच्या पत्राची होळी करण्यात आली.
यावेळी दिलीप देसाई म्हणाले, समन्वय बैठकीत पालकमंत्र्यांनी ‘पुजारी हटाओ’संदर्भात समिती स्थापन करा, असे आदेश दिले आणि आठवड्याभरातच घूमजाव केले. त्यामुळे भाजप सरकारकडून या प्रकरणात न्याय मिळेल, अशी अपेक्षा नाही. न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ असते. आंदोलनातून सर्वांचे लक्ष विचलित करून मूळ मुद्दा बाजूला सारण्यासाठी धमकीचे पत्र पाठविण्यात आले आहे, त्याकडे आम्ही दुर्लक्षच केले आहे. ‘पुजारी हटाओ’चा निर्णय होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही.
वसंतराव मुळीक म्हणाले, अवघे कोल्हापूर आता पुजाऱ्यांच्या मनमानीविरोधात बोलू लागले आहे. मूळ मागणीला बगल देण्यासाठी त्याला जातीचा लढा दाखविला जात आहे. आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो आहोत, हा लढा जातीविरोधात नाही तर पुजाऱ्यांच्या प्रवृत्तीविरोधात आहे.
यावेळी आर. के. पोवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप पाटील, किशोर घाटगे, संजय पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या जयश्री चव्हाण, अॅड. चारूशीला चव्हाण, माजी नगरसेवक आदिल फरास, प्रकाश पाटील-सरुडकर यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगताप यांना भोवळ
या आंदोलनासाठी उपस्थित असलेले लाला जगताप यांना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. आंदोलकांनी त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
पुजाऱ्यांना प्रतिगामी शक्तींचे पाठबळ
डॉ. सुभाष देसाई म्हणाले, वर्षभरापूर्वी मला या पुजाऱ्यांच्या वतीने जिवे मारण्याची धमकी दिली. तेव्हापासून पोलिसांनी एकाही पुजाऱ्याला अटक केलेली नाही. आता पुन्हा तीन आंदोलकांना धमकीचे पत्र आले आहे. यावरून पुजाऱ्यांना प्रतिगामी शक्तींचे पाठबळ असल्याचे सिद्ध होते. वास्तविक गुन्हे दाखल असलेला पुजारी अजित ठाणेकर याला तातडीने अटक करून त्याची संपत्ती जप्त केली पाहिजे. पुजाऱ्यांवर आयकर खात्याने छापे टाकले पाहिजेत.