होळी लहान पोळी दानला प्रतिसाद, विद्यार्थ्यांनी पोहचविल्या वीटभट्टीवर पोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 03:58 PM2020-03-10T15:58:17+5:302020-03-10T16:00:25+5:30
आपल्यातील दुर्गुण, अनिष्ट प्रथा, रूढींना दहन करत सोमवारी कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. होळी लहान..पोळी दान या उपक्रमाला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर : आपल्यातील दुर्गुण, अनिष्ट प्रथा, रूढींना दहन करत सोमवारी कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. होळी लहान..पोळी दान या उपक्रमाला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला.
पुरणाची पोळी होळीत जाळून टाकण्याऐवजी ती भूकेलेल्यांच्या पोटात घाला, या पुरोगामी कार्यकर्त्यांच्या हाकेला गेल्या काही वर्षांत चांगला प्रतिसाद लाभत आहे. नागरिक स्वत:हून पुढाकार घेऊन नैवेद्याची पोळी एकत्र करून सामाजिक संस्थांना देत आहेत. शिवाजी मराठा हायस्कूलच्यावतीने देखील पोळ्याचे संकलन करण्यात आले होते. या पोळ्या वीटभट्टीवर देण्यात आल्या.
शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोळी होळीत न टाकता भुकेलेल्यांपर्यंत पोहोचविल्या. गेली दहा वर्षे हे विद्यार्थी हा उपक्रम करत आहेत. होळीनंतर पोळ्या होळी न टाकता त्या सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर येथे आणून देण्याचे आवाहन या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यानुसार जमा झालेल्या पोळ्या या विद्यार्र्थ्यानी मंगळवारी सकाळी कोल्हापूर शहर परिसरातील वीटभट्ट्यांवर नेउन पोहचविले. गेली दहा वर्षे हा उपक्रम या शाळेतील विद्यार्थी राबवितात.
हुताशनी पौर्णिमा यादिवशी दारात शेणी पेटवून होळी करण्याची परंपरा आहे. होलिका राक्षसिनीच्या पौराणिक कथेशी हा सण जोडला असला तरी आपल्यातील राग, लोभ, द्वेष, मत्सर यासोबतच समाजातील चुकीच्या रुढी परंपरांना जाळून टाका आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा, असा संदेश हा सण देतो. या दिवसापासून खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होतो असं म्हणतात.
यानिमित्त सोमवारी रात्री अंबाबाई मंदिराच्या बाह्य आवारात पारंपरिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते होलिका पूजन व प्रज्वलन झाले.
सकाळपासून घरोघरी पुरणपोळीचा घमघमाट सुटला होता. दारात रंगांची सुरेख रांगोळी सजली. दारात एरंडेल झाडाची फांदी आणि शेणी रचण्यात आल्या. पुरणाची पोळी होळीत टाकण्याऐवजी त्याचा केवळ नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर होळी पेटवण्यात आली.
एकीकडे दारादारात तर दुसरीकडे गल्लोगल्ली स्थानिक मंडळांकडूनही होळी पेटवण्यात आली. पारंपरिक टिमक्या, नव्याने आलेले ढोल, ताशा वाजवत होळीभोवती फिरताना लहान मुले व पुरुष मंडळींनी फेऱ्या मारल्या. यानिमित्त शहरात सर्वत्र उत्साह होता. रात्रीच्या अंधारात पेटलेल्या होळ््या परिसर प्रकाशमान करीत होत्या.