बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी भरती निर्णयाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:47 PM2019-09-18T18:47:37+5:302019-09-18T18:51:27+5:30
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने बाह्य यंत्रणेद्वारे शिपाई पुरविण्यासाठी केलेल्या दरकराराविरोधात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
कोल्हापूर : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने बाह्य यंत्रणेद्वारे शिपाई पुरविण्यासाठी केलेल्या दरकराराविरोधात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २९ आॅगस्ट रोजीच्या शासन निर्णयान्वये वस्त्रोद्योग विभागाने शिपाई भरतीसाठी अल्फाकॉम सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्यासोबत दरकरार केला आहे. तसेच १४ जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयान्वये वित्त विभागाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची २५ टक्के मंजूर पदे निरसीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाह्य यंत्रणेद्वारे ही पदे भरल्यास तसेच दरवर्षी २५ टक्के पदे निरसीत केल्यास भविष्यात चतुर्थश्रेणी अस्तित्व संपुष्टात येऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वारसा हक्काने व अनुकंपा तत्त्वाने नोकऱ्यादेखील मिळणार नाहीत, तरी शासनाने वरील दोन्ही निर्णय रद्द करावेत व पूर्वीप्रमाणे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याची रिक्त पदे व नवी भरती करावी, वारसा हक्क व अनुकंप विनाअट चालू करावी व कंत्राटीकरण बंद करावे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले, सरचिटणीस महेश पाटील, कृष्णा नाईक, प्रकाश निर्मळे, पी. एस. चव्हाण, विष्णू पाटील, सुनील कदम, जयवंत जाधव, राम परमार, आदी उपस्थित होते.