गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य, वाकरेत सलग २१ वर्षे अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 04:01 PM2020-03-10T16:01:12+5:302020-03-10T16:02:21+5:30
होळी आणि पोळीचे अतूट नाते आहे; आपल्याकडे होळीला पोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. मात्र, होळीला पोळी अर्पण करण्याऐवजी गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य दाखविण्याचा अभिनव उपक्रम वाकरे (ता. करवीर) येथे राबविण्यात आला. विशेष म्हणजे गेली २१ वर्षे हा उपक्रम राबविला जात असून, त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर : होळी आणि पोळीचे अतूट नाते आहे; आपल्याकडे होळीला पोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. मात्र, होळीला पोळी अर्पण करण्याऐवजी गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य दाखविण्याचा अभिनव उपक्रम वाकरे (ता. करवीर) येथे राबविण्यात आला. विशेष म्हणजे गेली २१ वर्षे हा उपक्रम राबविला जात असून, त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
फार पूर्वीपासून वाकरेमध्ये ग्रामदैवत जोतिर्लिंग मंदिराच्या दारात सार्वजनिक होळी पेटवण्याची प्रथा आहे. त्यासाठी गावातून गोवऱ्या गोळा करून सायंकाळी मंदिरासमोर होळी केली जाते. होळीत ग्रामस्थ पुरणपोळ्या, भाताचा नैवेद्य व नारळ अर्पण करतात. होळीत टाकल्या जाणाऱ्या नैवेद्यांमुळे हजारो पोळ्या होळीत खराब होतात.
पोळीसह भाताची नासाडी होते. हाच नैवेद्य गोरगरीब व गरजूंना देण्यासाठी ग्रामस्थांचे परिवर्तन करण्याचा निर्णय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रा. एस. पी. चौगले यांनी वीस वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार आजपर्यंत हा उपक्रम सुरू आहे.
यावेळी सरपंच वसंत तोडकर, प्रा. एस. पी. चौगले, पोलीसपाटील सुरेश पाटील, प्रा. एस. ए. पाटील, विजय पाटील, बळी पाटील, शिवाजी चौगले, नागेश शिंदे, बिजू कांबळे, महादेव पाटील, संदीप पाटील, रघू कांबळे, आनंदा गुरव, आदी उपस्थित होते.