बालिंगा येथे इतिहासाच्या साक्षीदाराचीच होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:24 AM2021-01-03T04:24:24+5:302021-01-03T04:24:24+5:30
कोपार्डे : दरवर्षी शासन शतकोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. पण या ...
कोपार्डे : दरवर्षी शासन शतकोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. पण या पथदर्शी धोरणाला व्यक्तिगत स्वार्थामुळे हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. बालिंग्यांच्या पूर्वेला कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याशेजारी शतकांहून अधिक काळाचा साक्षीदार ठरलेल्या आणि उन्हाळ्यात आपल्या डेरेदार पारंब्यांनी हजारो जणांना सावली देणाऱ्या वडाच्या झाडाला अज्ञाताने आग लावल्याने हा इतिहासाचा साक्षीदार आता शेवटच्या घटका मोजत आहे. या झाडाच्या खोडाला आग लावल्याने हे झाड कोसळू लागले आहे. कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गावर दुतर्फा मोठे व गर्द हिरवेगार वृक्ष आहेत. या झाडांच्यामुळे मार्गावरून प्रवास करताना वेगळाच आनंद मिळतो. विशेषतः बालिंगा ते रिंगरोड फुलेवाडीपर्यंतची वडाची झाडे शंभरी पार केलेली आहेत. बालिंगा गावच्या पूर्वेला ओढ्यावरील १०० वर्षांहून जुने असणाऱ्या वडाच्या झाडाच्या खोडला अज्ञाताकडून आग लावल्याने हे झाड होरपळून गेले आहे. मोठ्या प्रमाणात खोड जळल्याने पारंब्यातील जीव संपला आहे. या झाडाचा शाखा विस्तार मोठा आहे. यातील फांद्या कोल्हापूर-गगनबावडा या रहदारीच्या रस्त्यावर आलेल्या आहेत. चार दिवसांपूर्वी यातील एक फांदी गळून थेट रस्त्यावर कोसळली. या झाडाच्या आणखी फांद्या झाडाचे खोड जळाल्याने कमकुवत झाल्या आहेत. रस्त्यावर आलेल्या फांंद्या एखादी वाऱ्याची मोठी झुळूक आली तर मोडून थेट रस्त्यावर पडून अपघातही घडण्याची भीती आहे.
फोटो ०२ बालिंगा वड
कँप्शन) कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंग्यांच्या पूर्वेला असणाऱ्या ओढ्यावरील मोहरी शेजारी असणाऱ्या १०० वर्षांच्या झाडाच्या खोडाला आग लावण्याचा प्रकार झाला. यामुळे या झाडाचे नुकसान झाले आहे