इतिहासाच्या साक्षीदाराचीच होळी; खिळेमुक्त वृक्ष संकल्पनेला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:24 AM2020-12-31T04:24:08+5:302020-12-31T04:24:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : दरवर्षी शासन शतकोटी वृक्षलागवडीचा संकल्प करते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो; पण या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : दरवर्षी शासन शतकोटी वृक्षलागवडीचा संकल्प करते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो; पण या पथदर्शी धोरणाला व्यक्तिगत स्वार्थ व मानसिक कुमकुवतपणा यामुळे कसा धक्का दिला जातो याचे जिवंत उदाहरण बालिंग्याच्या पूर्वेला असलेल्या कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याशेजारी असलेल्या वडाच्या झाडाला आग लावल्याने इतिहासाचा साक्षीदार असणारे हे झाड कोसळू लागले आहे. झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना आजही जनमानसात रूजलेली दिसत नाही. शासन दरवर्षी शतकोटी वृक्षलागवड धोरण राबविते. यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर जनतेने सहभागी व्हावे व ही वृक्षलागवड लोकचळवळ व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे; पण व्यक्तिगत स्वार्थासाठी काहीजण एखादा वृक्ष आपल्यासाठी अडचणीचा ठरत असला तर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक शक्कल लढवितात, असे चित्र पाहायला मिळते.
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर बालिंगा गावाच्या पूर्वेला असणाऱ्या ओढ्यावरील मोहरीजवळ १०० वर्षांच्या असणाऱ्या वडाच्या झाडाच्या खोडाला अज्ञाताकडून आग लावल्याने हे झाड होरपळून गेले. मोठ्या प्रमाणात खोड जळल्याने या झाडाला असणाऱ्या फांद्यांतील जीव संपला आहे. या झाडाचा शाखा विस्तार मोठा आहे. यातील फांद्या कोल्हापूर-गगनबावडा या रहदारीच्या रस्त्यावर आलेल्या आहेत. चार दिवसांपूर्वी यातील एक फांदी गळून थेट रस्त्यावर कोसळली. वेळ चांगली म्हणून कोणताही अपघात घडला नाही.
या झाडाच्या आणखी फांद्या झाडाचे खोड जळाल्याने कुमकुवत झाल्या आहेत. रस्त्यावर आलेल्या फांंद्या एखादी वाऱ्याची मोठी झुळूक आली तर मोडून थेट रस्त्यावर पडून अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(फोटो कँप्शन)
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंग्याच्या पूर्वेला असणाऱ्या ओढ्यावरील मोहरीशेजारी असणाऱ्या १०० वर्षांच्या झाडाच्या खोडाला आग लावण्याचा प्रकार झाला. यामुळे या झाडाचे नुकसान झाले आहे.