सुट्ट्यांमुळे चांदोलीच्या पर्यटनाला बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:20 AM2020-12-26T04:20:39+5:302020-12-26T04:20:39+5:30
शित्तूर-वारूण : चांदोलीत पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आजच्या नाताळच्या सुट्टीबरोबरच शनिवार-रविवार आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे चांदोली पर्यटनाला बहर ...
शित्तूर-वारूण : चांदोलीत पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आजच्या नाताळच्या सुट्टीबरोबरच शनिवार-रविवार आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे चांदोली पर्यटनाला बहर आला आहे. चांदोली धरण तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील निसर्गसौंदर्याचाही पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत. आज नाताळची सुट्टी आहे. उद्या चौथा शनिवार व पुन्हा रविवार अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पर्यटनाची संधी उपलब्ध झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागल्यामुळे पर्यटनस्थळे तसेच धार्मिक स्थळांवरील बंदी सरकारने उठविली आहे. कोरोनामुळे आलेली मरगळ घालवण्यासाठी अनेकांनी पर्यटनाचा बेत आखला आहे. परिणामी अनेकजण चांदोलीत मुक्कामी येऊ लागले आहेत. कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असणारे चांदोलीचे पर्यटन एक नोव्हेंबरपासून सुरू होताच एका महिन्यात तब्बल दहा हजारांहून अधिक पर्यटकांनी चांदोलीला भेट दिली. पर्यटकांची ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
पर्यटकांची संख्या वाढू लागल्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून थंडावलेले बारीक-सारीक उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. पर्यटकांची गरज त्यांच्या आवडी-निवडी पाहून येथील लघुउद्योगांमध्ये वाढ होऊ लागली आहे. कोरोनामुळे आलेली मरगळ हळू-हळू दूर होऊ लागली आहे. सरत्या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाचे स्वागत यासाठीही अनेकजण चांदोलीकडे येऊ लागले आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने चांदोली धरण तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ही दोन्ही पर्यटनस्थळे ३०, ३१ डिसेंबर व ०१ जानेवारी असे तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे चांदोलीत थर्टी फर्स्ट पर्यटकांना साजरा करता येणार नाही.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता येथे पर्यटकांसाठी निवासस्थान, भोजन, मनोरंजन अशा सोयी-सुविधांमध्ये प्रशासनाने वाढ करण्याची गरज आहे.
फोटो-
सलग सुट्ट्यांमुळे चांदोलीच्या पर्यटनाला असा बहर आला आहे (छाया : सतीश नांगरे)