मुलांचा घरकामात समावेश करणारी सुटी असावी

By admin | Published: March 30, 2016 11:33 PM2016-03-30T23:33:37+5:302016-03-30T23:49:05+5:30

--जुई कुलकर्णी

Holidays that include children's house | मुलांचा घरकामात समावेश करणारी सुटी असावी

मुलांचा घरकामात समावेश करणारी सुटी असावी

Next



मुलांना सुटी लागली की त्यांचं मन कुठे रमवावं ? त्यांच्या कोणत्या कलागुणांना वाव द्यावा ? की त्यांना उन्हाळी शिबिरात घालावे, या विचारात पालक असतात. अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ वार्षिक परीक्षा संपल्या की पालकांच्या मनात माजलेला असतो. मुलांच्या सुटीचं नियोजन कसं करावं, यामध्ये पालकांचा कशा प्रकारे सहभाग असावा, याबाबतीत ‘पालक मंच संवेदना’च्या जुई कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद...


प्रश्न : सुटीकडे पालकांनी मुलांच्या नजरेतून पाहावे का?
उत्तर : सध्याची कुटुंब पद्धती पाहता नोकरदार आई-वडील असतील तर त्यांच्याकडे पर्याय फार कमी असतात. तरीही मुलांच्या कल्पनेतील सुटी कशी असावी, हे जाणून घ्यावे. इतर पालक आपल्या मुलांना कोणत्या तरी शिबिरात घालतात म्हणून आपणही आपल्या पाल्यानेही त्याच शिबिरात जायला हवे, असे बंधन त्याच्यावर लादू नये. नाहीतर हे शिबिर म्हणजे मुलांना दुसरी शाळाच वाटू लागेल. सुटीपूर्वी गणित, भूगोल, विज्ञान, आदी विषयांचा अभ्यास करावा लागायचा. आता इथेही दुसऱ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो आहे, असे वाटू नये.
प्रश्न : उन्हाळी शिबिरांचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी फायदा होतो?
उत्तर : उन्हाळी शिबिरांचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी फायदा होतोच असे नाही; पण अशी शिबिरे व्यक्तिमत्त्व विकासाला नक्कीच पूरक असतात. अनुभवांची देवाण-घेवाण करणारी शिबिरे मुलांच्या दृष्टीने फायद्याची ठरतात.
प्रश्न : शिबिरांमुळे मुलांचे मनसोक्त सुटी एंजॉय करण्याचे स्वातंत्र्य हरवते आहे ?
उत्तर : नाही, असे नाही वाटत. पूर्वी मनसोक्त एंजॉय म्हणजे रानावनात भटकणे, सूरपारंब्या खेळणे, सायकल शिकणे, गल्लीत खेळणे अशा गोष्टींसाठी मोकळीक असायची. आता शहरात मोकळी जागा मिळणे शक्य नाही. त्यात पुन्हा सुरक्षिततेचाही विचार करावा लागतो. सध्या छंद वर्ग, संस्कार शिबिरे, समर कॅम्प अशा चार-पाच पर्यायांपैकी एकाची निवड पालकांना किंवा मुलांना करावी लागते. या गोष्टींमधूनही सुटी एंजॉय करता येते.
प्रश्न : सुटीत मुलांचे नातेवाइकांकडे, आजोळी जाण्याचे प्रमाण अलीकडे कमी झालंय?
उत्तर : हो, हे खरे आहे. अलीकडे पालक आपल्या मुलाला नातेवाइकांकडे पाठवायला तयार नसतात. आजोळी जाण्याचं मुलांचं प्रमाणही कमी झालं आहे. त्यामुळे समवयस्क आतेभाऊ, मामेभाऊ, बहिणी यांच्यामधील मुलांचे शेअरिंग कमी झाले आहे.
प्रश्न : ‘सुटी म्हणजे सहलीचेच नियोजन’ अशी धारणा कितपत योग्य वाटते ?
उत्तर : सुटी म्हणजे फक्त सहली आयोजित करणे असे समीकरण बनते आहे, हे काही अंशी खरे आहे; पण यामध्ये विदेशातील किंवा महागड्या पर्यटनस्थळांपेक्षा गड-किल्ल्यांचा समावेश असावा. खेडेगावात जाणं असेल, आसपासचे विकासाचे प्रकल्प पाहायला जाणं असेल, निव्वळ डोंगरदऱ्यांत, निसर्गात भटकणे असेल, रानमेव्याचा आस्वाद घेणं असेल, नातेवाईक, मित्रमैत्रिणींचा गट जमवून अशा छोट्या सहली काढल्या, तर त्यातली रंगत अजूनच वाढेल; मग गमतीच्या स्पर्धा, विविध कला-गुणांचं सादरीकरण, अशा गोष्टींनी सहलीचा आनंद अनेकपटींनी वाढेल.
प्रश्न : सुटीत मुलांशी संवाद साधण्यासाठी पालकांनी अधिक वेळ देणे गरजेचे असते?
उत्तर : संवाद ही कला आहे. पालकांनी वर्षभर मुलांशी संवाद साधायला हवा. मुलांची सुटी आहे म्हणून त्यांच्यासाठी मुद्दाम वेळ काढणे म्हणजे संवादातील कृत्रिमता वाटते. मुलांशी संवाद साधता यावा यासाठी वेगळे काही करतोय, सहली वगैरेंचं नियोजन करतोय, महागडी इलेक्ट्रॉनिक गॅजेटस् आणून देतोय असे असू नये.
प्रश्न : सुटीचा सदुपयोग कशा प्रकारे करावा?
उत्तर : मुलांना व्यावहारिक जीवनाची ओळख करून देण्यासाठी सुटी ही सुसंधी मानावी. मुलांना घरकामात मदत करायला शिकविले पाहिजे. मग भाजी निवडणे, स्वत:चे कपडे स्वत: धुणे, स्वत:चे कपाट नीट लावणे, विजेचे बिल भरायला लावणे, बाजार करणे, आदी गोष्टींमुळे त्यांना परिसराचे ज्ञान मिळते. तसेच एखादा पदार्थ कसा बनवितात याचे प्रात्यक्षिक दाखविणे अशा गोष्टी मुलांना सुटीच्या काळात शिकवाव्यात. त्यांना स्वत:ची जबाबदारी स्वत:च घ्यायला शिकविणे या गोष्टीमुळे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व तयार होण्यास मदत होते. जबाबदार नागरिक घडवायचे असतील तर मुलांनाही पालकांच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवायला हवे. मुलांचा दृष्टिकोन विकसित करणे पालकांचे ध्येयच असायला हवे. स्वयंशिस्तीचे धडे देण्यास पालकांनी सुटीच्या काळात प्रयत्न करायला हवेत.
प्रश्न : सुटीच्या काळात वाचन संस्कृती जोपासण्याकडे लक्ष द्यायला हवे?
उत्तर : सुटीच्या काळातच नाही तर वर्षभर मुलांना अवांतर वाचनाकडे पालकांनी प्रवृत्त करायला हवे. फक्त मुलांना विक तची नवी पुस्तके आणून देणे म्हणजे जबाबदारी संपली असे अनेकांना वाटते; परंतु मुलांना ग्रंथालयाचे सभासद बनविणे, तिथल्या पुस्तकांची यादी पाहणे, शेअरिंगची आवड त्यांच्यात निर्माण करणे, आदी गोष्टींसाठी त्यांना प्रोत्साहित करायला हवे.
अलीकडे वाचनाची शिबिरेही भरविली जातात; पण त्या शिबिरातून आपल्या मुलाला नेमका किती फायदा होईल, याचा पालकांनी जागरुकपणे विचार करावा. सातत्यपूर्ण वाचन ही सवय असली पाहिजे.
- संतोष तोडकर

Web Title: Holidays that include children's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.