विविध १२४७ अभ्यासक्रमांचे घरबसल्या शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:40 PM2020-02-26T13:40:33+5:302020-02-26T13:45:14+5:30
प्रशासनाबरोबरच शिक्षण पद्धतीत शिवाजी विद्यापीठाकडून नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. याअंतर्गत विविध १२४७ अभ्यासक्रम हे विद्यापीठाने ‘मूडल’ (मॉड्युलर आॅब्जेक्ट ओरिएंटेड डायनॅमिक लर्निंग सिस्टीम) प्रणालीवर आणले आहेत. त्याद्वारे आॅनलाईन पद्धतीने घरबसल्या आणि कोणत्याही ठिकाणाहून विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, संगणकाच्या माध्यमातून शिक्षण घेता येत आहे. सध्या ७२०० विद्यार्थी हे मूडलचा वापर करीत आहेत.
संतोष मिठारी
कोल्हापूर : प्रशासनाबरोबरच शिक्षण पद्धतीत शिवाजी विद्यापीठाकडून नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. याअंतर्गत विविध १२४७ अभ्यासक्रम हे विद्यापीठाने ‘मूडल’ (मॉड्युलर आॅब्जेक्ट ओरिएंटेड डायनॅमिक लर्निंग सिस्टीम) प्रणालीवर आणले आहेत. त्याद्वारे आॅनलाईन पद्धतीने घरबसल्या आणि कोणत्याही ठिकाणाहून विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, संगणकाच्या माध्यमातून शिक्षण घेता येत आहे. सध्या ७२०० विद्यार्थी हे मूडलचा वापर करीत आहेत.
शिक्षण व्यवस्थापन यंत्रणा असलेल्या मूडलचा विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपूर्वी शिक्षण पद्धतीमध्ये समावेश केला आहे. विद्यार्थ्यांना कधीही आणि कोणत्याही ठिकाणाहून शिक्षण घेता यावे, या उद्देशाने विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने त्याची सुरुवात करण्यात आली. विद्यापीठाने कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विविध १२४७ अभ्यासक्रम मूडलवर आणले आहेत.
या अभ्यासक्रमांच्या नोटस्, प्रश्नपत्रिका आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ, आदी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन, संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेणे आणि एखाद्या मुद्याबाबत शंका असल्यास त्याचे निरसन करून घेणे विद्यार्थ्यांना शक्य झाले आहे. आॅनलाईन पद्धतीने त्यांना चाचणी देता येते.
या पद्धतीने सध्या ७२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठातील डॉ. कविता ओझा, उर्मिला पोळ आणि परशुराम वडार यांनी या पद्धतीबाबत प्राध्यापक, शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. विविध अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संलग्नीत २९१ महाविद्यालयांतील २९९ हून अधिक प्राध्यापक हे मूडलद्वारे शिक्षण देत आहेत. आपल्या वेळेप्रमाणे शिक्षण घेता येत असल्याने मूडलचा वापर करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
असा करता येईल ‘मूडल’चा वापर
विद्यापीठात विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर त्याच्याकडून त्याचा मोबाईल, ई-मेल आयडीची माहिती अंतर्गत गुणवत्ता कक्षाकडून घेतली जाते. त्या ई मेलवर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील मूडलची लिंक पाठविली जाते. या लिंकवर नोंदणी केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचा आयडी आणि पासवर्ड तयार होतो. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूडलचा वापर करता येतो. एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासाबाबतची शंका उपस्थित केल्यास त्याबाबतचा ईमेल संबंधित प्राध्यापकांना जातो. प्राध्यापकांनी अभ्यासक्रमाबाबतचा नवी माहिती, व्हीडिओ अपलोड केल्यास त्याची माहिती ईमेलद्वारे विद्यार्थ्यांना मिळते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
नव्या पिढीच्या पद्धतीनुसार शिक्षण
सध्याची पिढी ही डिजिटल बोर्न आहे. तंत्रज्ञान वापरामध्ये तरुणाई आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांना पारंपरिक खडू-फळा पद्धतीऐवजी आॅनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने मूडलची सुरुवात केली आहे. सन २००२ मध्ये मार्टिन डोगिमास यांनी मूडल हे स्थापित आणि विकसित केले आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासक यांच्यासाठी एक मुक्त, विनामूल्य व्यासपीठ त्याद्वारे उपलब्ध करून दिले आहे. जगभरात या पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. त्यादिशेने जाण्याचे पाऊल विद्यापीठाने टाकले असून, त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. आर. के. कामत यांनी सांगितले.