सात महिन्यांत हजारावर कुटुंबांना घरपोहोच धान्य किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:38 AM2020-12-12T04:38:41+5:302020-12-12T04:38:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळापासून ते आजतागायत ‘कोल्हापूर वुई केअर एनजीओ कम्पॅशन २४’ या संस्थेतर्फे जिल्ह्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळापासून ते आजतागायत ‘कोल्हापूर वुई केअर एनजीओ कम्पॅशन २४’ या संस्थेतर्फे जिल्ह्यातील हजारावर गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप केले जात आहे. याशिवाय कुत्री, गायी अशा मुक्या जनावरांचीही काळजी वाहिली जात आहे.
उद्योजक मिलिंद धोंड यांच्या पुढाकाराने नऊ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘वुई केअर’ने आजवर अनेक गरजू व्यक्तींना मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक बांधीलकीचा हा वसा कोरोना लॉकडाऊनच्या काळात मोठ्या पुढाकाराने जपला गेला. या काळात हातावरचे पोट असलेल्या गरीब, गरजू कुटुंबांची वाताहत झाली. शहरासह जिल्ह्यातील अशा गरजू कुटुंबांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यास सुरुवात झाली. सुरुवातीचे तीन महिने स्टँड, स्टेशन, बसस्टॉप व रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या फिरस्त्यांनाही रोज दोन वेळचे जेवण पुरविण्यात येत होते.
काय दिले जाते...
गेले सात महिने एका कुटुंबाला अन्नधान्य, किराणा माल यांसह जीवनावश्यक वस्तूंचे ९०० रुपये किमतीचे किट दिले जाते. यात अंध-अपंग अशा १५९ कुटुंबांचा, ५० हून अधिक तृतीयपंथीयांचा समावेश आहे. संस्थेने आजवर तीन हजारांवर किटचे वाटप केले असून दिव्यांग कुटुंब अजूनही पूर्वपदावर आलेले नसल्याने व त्यांना रोजगाराचे साधन नसल्याने या कुटुंबांना आजही हे किट दिले जात आहे. पुढील दोन ते तीन महिने हा उपक्रम सुरू राहणार आहे.
प्राणिमात्रांचीही काळजी
या काळात सर्वसामान्य माणसांसोबतच कुत्रे, गायी अशा मुक्या जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत होते. त्यामुळे या प्राण्यांसाठीही चपात्या, बिस्किटे, कुत्र्यांसाठी डाॅग फूड दिले जात होते. अशा रीतीने ५५० कुत्री आणि ५५ गायींना अन्न दिले जात होते.
...........................................................
फोटो नं १११२२०२०-कोल-वुई केअर०१,०२
ओळ : कोल्हापूर वुई केअर या संस्थेतर्फे गरीब व गरजू कुटुंबांना अजूनही अन्नधान्याच्या किटचे वाटप केले जाते.
....................