दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना पंचगंगा बँकेची घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:36+5:302021-02-23T04:39:36+5:30
कोल्हापूर : पंचगंगा बँकेच्यावतीने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा देण्याचा निर्णय ...
कोल्हापूर : पंचगंगा बँकेच्यावतीने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा देण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे यांनी सोमवारी जाहीर केला. बँकेच्या देवकर पाणंद शाखेत सुवर्णमहोत्सवी प्रारंभाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
सुवर्णमहोत्सवी प्रारंभाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शहर उपनिबंधक पी. एल. जगताप, राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला.
यावेळी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये जीवनधार ब्लड बँकेच्या सहकार्याने १०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यानिमित्ताने बँकेच्या सर्व शाखांमध्ये तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्ष शिपुगडे म्हणाले, २२ फेब्रुवारी १९७२ रोजी लावलेल्या एका छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. बॅंकेने सोनेतारण आणि वाहन तारणावरील कर्जाचा व्याज दर कमी केला आहे.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डाव्या हातात ठेवीदारांचा विश्वास आणि उजव्या हातात कर्जदारांची पत, यावरच बँकेची प्रगती अवलंबून असते. लहान मुलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी पिगी बँक योजनेची सुरुवात हा स्तुत्य उपक्रम आहे.
उपनिबंधक जगताप म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात बँकेच्या ठेवीत घट न होता वाढच होत गेली. यावरून ग्राहकांचा बँकेवरील विश्वास दिसून येत आहे.
तानाजी सावंत म्हणाले, विश्वास आणि सभासद, ग्राहक यांना दिली जाणारी सेवा यातूनच पंचगंगा बँकेने वटवृक्षाची उंची गाठली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस यांनी स्वागत केले, तर उपाध्यक्ष राहुल भोसले यांनी आभार मानले. यावेळी बँकेचे संचालक पी. एस. कुलकर्णी, विकास परांजपे, दिगंबर जोशी, चंद्रशेखर धर्माधिकारी, उपेंद्र सांगवडेकर, संदीप पाटील, नंदकुमार दिवटे, भालचंद्र साळोखे, विजय चव्हाण, विवेक शुक्ल, केशव गोवेकर, डॉ. माधुरी कुलकर्णी, वृषाली बंकापुरे, महाव्यवस्थापक सुशील कुलकर्णी यांच्यासह सभासद, ग्राहक उपस्थित होते.
२२०२२०२१ कोल पंचगंगा बँक न्यूज फोटो
पंचगंगा बँकेच्या सुवर्णमहोत्सवाच्या प्रारंभ कार्यक्रमामध्ये सोमवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, शहर उपनिबंधक पी. एल. जगताप, बँकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे, उपाध्यक्ष राहुल भोसले उपस्थित होते.