प्रस्थापितांना घरचा रस्ता !

By admin | Published: November 3, 2015 12:44 AM2015-11-03T00:44:00+5:302015-11-03T00:46:00+5:30

महापालिकेत धक्कादायक निकाल : तीन माजी महापौर, तीन माजी उपमहापौर, तर १२ विद्यमान नगरसेवक पराभूत

Home to the establishment home! | प्रस्थापितांना घरचा रस्ता !

प्रस्थापितांना घरचा रस्ता !

Next

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना अक्षरश: वेचून काढून पराभूत केल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिकेच्या राजकारणात ‘सेटलमेंट’ करणाऱ्यांनाही घरी बसविल्याची प्रतिक्रिया लोकांतून व्यक्त झाली. पैसा आणि दहशत सोबतीला घेऊन काही झाले तरी आम्ही निवडून येऊ शकतो असा आव आणणाऱ्यांना लोकांनी जमिनीवर आणले. निकालापूर्वीच फटाक्यांची माळ लावणाऱ्या प्रकाश नाईकनवरे यांना लोकांनी ठरवून पाडले. मतदारांना गृहित धरू नका, तो तुमच्या पायात योग्यवेळी फटाके वाजवू शकतो, असाच कौल त्यांनी दिला. माजी महापौर नंदकुमार वळंजू, उदय साळोखे, जयश्री सोनवणे या तीन माजी महापौरांसह तीन माजी उपमहापौर व १२ विद्यमान नगरसेवकांना घरचा रस्ता दाखविला.


एकदा महापौर या सर्वोच्च पदाचा बहुमान मिळाल्यानंतर दुसऱ्याला संधी द्यायला हवी; परंतु तसे न होता पुन्हा रिंगणात उतरलेल्या माजी महापौरांना लोकांनी तुम्ही पुन्हा महापालिकेकडे फिरकू नका, असेच बजावले. तसेच माजी उपमहापौरांनाही सुनावले. राष्ट्रवादीचे नेते आर. के. पोवार यांना सुनेचा पराभव रोखता आला नाही. जिल्ह्याचे राजकारण सांभाळणाऱ्या जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना मुलगा अभिषेक यांना विजयाचा गुलाल लावता आला नाही. भाजपच्या आर. डी. पाटील यांचा अर्ज छाननीत बाद झाला. मुलगी श्रृती पाटील यांचाही पराभव झाला. शिवसेनेबरोबरचा संघर्ष त्यांना महागात पडला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर पराभूत झाल्याने पक्षाचे नाक कापले गेले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मात्र सुनेला विजयी करून पक्षातील दबदबा कायम राखला.
एकाच कुटुंबातील दोघांनी निवडणूक लढविलेलेही अनेक प्रभागांत पराभूत झाले. त्यामध्ये जे नव्याने रिंगणात होते त्यांना लोकांनी गुलाल लावला; परंतु सोनवणे दाम्पत्य, प्रकाश मोहिते दाम्पत्यास लोकांनी नाकारले. आम्ही कोणत्याही प्रभागातून लढलो तरी जिंकून येऊ शकतो, हा अहंगड लोकांनी जिरवला.


चव्हाण, आजरेकर यांचे स्वप्न पूर्ण
शिवाजी पेठेतील रामभाऊ चव्हाण व मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या घरात पंचवीस-तीस वर्षांनी आनंद फुलला आहे. रामभाऊ चव्हाण यांचे बंधू कै. शिवाजीराव चव्हाण यांनी १९९० मध्ये महापालिकेची निवडणूक लढविली होती. मात्र, भिकशेठ पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर यंदा मात्र
कै. शिवाजीराव यांचे चिरंजीव अजिंक्य चव्हाण यांनी पद्माराजे उद्यान प्रभागातून निवडणूक लढविली आणि पहिल्या दणक्यात विजय संपादन केला. तशीच स्थिती आजरेकर कुटुंबीयांची आहे. गणी आजरेकर यांनी १९८५ मध्ये निवडणूक लढविली, तेव्हा त्यांचा पराभव झाला. त्यानंतर प्रत्येक वेळी आरक्षणामुळे त्यांना निवडणूक लढविता आली नाही; परंतु यंदा मात्र त्यांच्या कॉमर्स कॉलेज प्रभागावर सर्वसाधारण महिला आरक्षण पडले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सून निलोफर आश्कीन आजरेकर यांना उभे केले. त्याही पहिल्या प्रयत्नात विजयी झाल्या.


सासरे पराभूत, सून मात्र विजयी
नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी व्हीनस कॉर्नरमधून, तर त्यांची सून पूजा नाईकनवरे यांनी शाहूपुरी तालीम प्रभागातून निवडणूक लढविली. प्रकाश नाईकनवरे यापूर्वी दोन वेळा निवडणूक जिंकले होते; पण यंदा त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे, त्यांच्या सून पूजा नाईकनवरे या विजयी झाल्या. अशाच अवस्थेला नगरसेवक श्रीकांत बनसोडे यांना सामोरे जावे लागले. श्रीकांत बनसोडे यांचा खोलखंडोबा प्रभागातून पराभव झाला, तर त्यांची सून उमा बनसोडे या बाजारगेट प्रभागातून विजयी झाल्या. त्यामुळे नाईकनवरे, बनसोडे समर्थकांची स्थिती ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशी होती.

सोनवणे-मोहिते बाहेर
सोनवणे व मोहिते या दोन घराण्यांना यंदा मतदारांनी ठोकरले. माजी महापौर जयश्री सोनवणे, त्यांचे पती माजी उपमहापौर हरिदास सोनवणे तसेच नगरसेविका यशोदा मोहिते व माजी नगरसेवक प्रकाश मोहिते हे कोणत्याही प्रभागात उभे राहिले की त्यांचा विजय निश्चित असायचा. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही दाम्पत्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला.

Web Title: Home to the establishment home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.