क्रीडा संकुलप्रश्नी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By admin | Published: May 21, 2017 12:43 AM2017-05-21T00:43:51+5:302017-05-21T00:43:51+5:30

मैदाने आठवड्यात उपलब्ध करून द्या : गुडघाभर गवतातून विभागीय आयुक्तांची पाहणी

Home Improvement of Sports Complex | क्रीडा संकुलप्रश्नी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

क्रीडा संकुलप्रश्नी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर उगवलेले गुडघाभर गवत, खुरटी झाडे यातून प्रत्यक्ष मार्ग काढत संपूर्ण संकुलाची शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून या क्रीडा संकुलाचे काम पूर्णत्वाकडे गेले नसून, त्याची दयनीय अवस्था पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची जागीच कानउघाडणी केली. किरकोळ स्वरूपात राहिलेली कामे पूर्ण करून ही क्रीडांगणे येत्या आठ दिवसांत खेळासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशा सक्त सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी विभागीय क्रीडा संकुलाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या ठिकाणी असणारे फुटबॉल मैदान, अ‍ॅथलेटिक, कबड्डी, खो-खो मैदान, तसेच शूटिंग रेंज, रनिंग ट्रॅक, आदींच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदारांकडे चौकशी केली.
संपूर्ण विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रथम कामावर देखरेख करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर नाराजी व्यक्त केली. जलतरण तलाव वगळता अन्य क्रीडांगणे तयार असली तरीही फुटबॉल, अ‍ॅथलेटिक, कबड्डी, खो-खोची क्रीडांगणे, शूटिंग रेंज यांची काही किरकोळ स्वरूपात राहिलेली कामे त्वरित पूर्ण करून ही क्रीडांगणे खेळाडूंच्या सुविधेसाठी त्वरित उपलब्ध करून द्या, असे विभागीय आयुक्त दळवी यांनी फटकारले. क्रीडा संकुलात वाढलेले गवत काढा, सर्व मैदानांची व्यवस्थित देखभाल करा, अशाही सूचना बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. संकुलाची परिस्थिती पाहता क्रीडा उपसंचालक आणि जिल्हा क्रीडाअधिकारी यांच्यात समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शुटिंग रेंजचे काम पूर्ण झाले असले तरीही तेथे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे सुनावले. दुरुस्ती, देखभालीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळही नियुक्त करण्याचे त्यांनी यावेळी आदेश दिले.



हे काय... स्विमिंग टँक?
संकुलातील जलतरण तलाव पाहून त्यांनी ‘हे काय... स्विमिंग टँक?’ असा प्रश्न उपस्थित केला. तेथे उगवलेले गवत, खुरटी झाडे पाहून त्यांनी ठेकेदारासह अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. येथे असणाऱ्या अपूर्ण कामांचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
गेट कुठायं... : संकुलाची पाहणी करताना दळवी यांनी प्रथम क्रीडा संकुलाचे गेट कुठायं? असा अधिकारी, ठेकेदारांना प्रश्न करून प्रवेशद्वारानजीक कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याबाबत खंत व्यक्त केली.

Web Title: Home Improvement of Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.