कोल्हापुरात घरांचा पथदर्शी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:18 AM2018-11-14T00:18:58+5:302018-11-14T00:19:02+5:30
कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पीपीपी तत्त्वावर गृहप्रकल्प राबविण्यास नागरिकांतून होत असलेला विरोध लक्षात घेता, उपलब्ध जागेवर स्वतंत्र घरे ...
कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पीपीपी तत्त्वावर गृहप्रकल्प राबविण्यास नागरिकांतून होत असलेला विरोध लक्षात घेता, उपलब्ध जागेवर स्वतंत्र घरे बांधण्याचा पथदर्शी प्रकल्प तयार करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून, तो यशस्वी झाला तरच अन्य ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या अशा पथदर्शी प्रकल्पाचे आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे.
देशातील प्रत्येक कुटुंबाला २०२२ सालापर्यंत स्वत:चे हक्काचे घर देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने संपूर्ण देशभरात त्याची अंमलबजावणी सुरू आहे. हा गृहप्रकल्प तीन प्रकारांचा आहे. पहिल्या प्रकारात ज्यांची स्वत:ची जागा आहे; परंतु घर बांधण्यास पैसे नाहीत, अशा व्यक्तींना सहा टक्के व्याजदराने दहा लाखांपर्यंत कर्ज देणे व त्यांना अडीच लाखांचे अनुदान, दुसऱ्या प्रकारात ज्यांची जागा नाही त्यांना सदनिका व अडीच लाखांचे अनुदान, तर तिसºया प्रकारात झोपडपट्ट्यांचा विकास करून सदनिका देण्यात येणार आहेत.
कोल्हापूर शहरात सुमारे आठ हजारांहून अधिक नागरिकांचे सदनिका व स्वत:च्या जागेत घर बांधण्यासाठीचे कर्ज व अनुदान मिळण्याचे प्रस्ताव महापालिकेकडे सादर केले आहेत; तर महापालिका प्रशासनामार्फत संभाजीनगर कामगार चाळ, बोंद्रेनगर, साळोखे पार्क, कदमवाडी अशा चार ठिकाणी झोपडपट्टी विकास करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
झोपडपट्टीच्या ठिकाणी गृहप्रकल्प राबविण्यास नागरिकांचा विरोध होत असून, आम्हाला घरे नकोत असे सांगण्यास सुरुवात झाली आहे. चार झोपडपट्ट्यांचे प्र्रस्ताव ‘म्हाडा’च्या पुणे कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांची छाननी व मंजुरीचे काम सुरू असतानाच नागरिकांकडून खो बसत असल्याने महापालिका अधिकारी काहीसे नाराज झालेले आहेत. जर नागरिकांचाच विरोध होणार असेल तर गृहप्रकल्प राबविणे योग्य नाही, असे अधिकाºयांचे मत बनले आहे.
झोपडपट्ट्यांचा विकास करताना प्रत्येकाला स्वतंत्र घर पाहिजे आहे. त्यामुळे प्रशासनासमोर एक पर्याय आलेला आहे. सध्या जेथे लोक राहतात त्याच जागेवर त्यांना स्वतंत्र घरे बांधून देण्याचा हा पर्याय आहे. त्याकरिता बोंद्रेनगर येथे एक पथदर्शी प्रकल्प तयार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
बोंद्रेनगरातील जागेवर एकसारखी ८४ घरे कशी बांधता येतील, याचे आराखडे तयार केले जात
आहेत. हा प्रकल्प यशस्वी
झाला आणि लोकांचा त्याला
पाठिंबा मिळाला तर अन्य
ठिकाणीही असा प्रकल्प राबविता येईल, असा अधिकाºयांना विश्वास वाटतो.