CoronaVirus Lockdown -गडहिंग्लज शहरात मस्जिदीत जमलेल्यांना केले होम क्वॉरंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 03:38 PM2020-04-04T15:38:44+5:302020-04-04T15:46:06+5:30
गडहिंग्लज शहरातील मस्जिदीत आलेले लोक साफसफाईसाठी आल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. तरीदेखील त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना देवून सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे ते सामुदायिक नमाजसाठी जमल्याची अफवा निरर्थक ठरली. याप्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील मस्जिदीत आलेले लोक साफसफाईसाठी आल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. तरीदेखील त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना देवून सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे ते सामुदायिक नमाजसाठी जमल्याची अफवा निरर्थक ठरली. याप्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील मेन रोडवरील सुन्नी जुम्मा मस्जिदीत कांहीजण नमाज पठणासाठी जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह मस्जिदीकडे तात्काळ धाव घेतली.
कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मस्जिदीचे प्रवेशद्वार बंद होते. पोलिसांनी आत जावून पाहिले असता त्याठिकाणी कोणीही नमाजपठण करताना आढळून आले नाही. मात्र, त्याठिकाणी आलेल्या सहाजणांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी मस्जिदीच्या साफसफाईसाठी आल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची खातरजमा केली.
दरम्यान, मस्जिदीत जमलेल्या त्या ६ जणांची उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकिय तपासणी करून त्यांना दिवसभर येथील शासकीय वसतीगृहातील कोरोना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. त्यानंतर मस्जिदीच्या साफसफाईच्या कामासाठी संबंधितांना रितसर ओळखपत्रे घेण्याची आणि सर्वांना होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याची सूचना देवून त्यांना सायंकाळी घरी सोडण्यात आले.