सर्वसामान्यांसाठी घर आवाक्याबाहेर !
By admin | Published: July 22, 2014 11:41 PM2014-07-22T23:41:03+5:302014-07-23T00:34:29+5:30
जमिनीचे दर गगनाला : बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य त्रस्त
प्रकाश पाटील - कोपार्डे
घरासाठी लागणाऱ्या सिमेंट, वाळू, स्टील, दगड, खडी अशा बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये गेल्या सहा महिन्यांत तब्बल दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे ‘असावे छोटेसे घरकुल छान’ असं म्हणणाऱ्यांना केवळ दहा बाय दहाचे साधे घर घेण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये मोजावे लागत आहेत. सर्वसामान्य माणसांना घरासाठी संपूर्ण आयुष्याची पुंजी खर्ची घालावी लागत असल्यामुळे त्यांच्यासाठी घर एक स्वप्नच बनले आहे.
प्रत्येकाला आपले हक्काचे घर असावे, असे मनोमन वाटते. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर कुटुंबवत्सल माणसाला भाड्याच्या घरापेक्षा आपल्या स्वत:च्या मालकीच्या घरात मुला-बाळांबरोबर राहण्याची इच्छा असते. अलीकडे बांधकाम साहित्याबरोबर मजुरीमध्ये दुप्पट वाढ झाल्याने सर्वसामान्य माणूस घर बांधण्याचा विचार करूच शकत नाही, असे चित्र आहे.
वाळूसाठी डिसेंबर २०१३ मध्ये नऊ हजार रुपये मोजावे लागत होते. आज हाच दर दुप्पट झाला असून, एक ट्रक वाळूसाठी २० ते २२ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सिमेंटचा दर २१० ते २५० रुपये होता. तो आता ३०० ते ३५० रुपयांवर पोहोचला आहे. २५०० ते ३००० रुपयांना एक हजार वीट मिळत होती, ती सध्या ३५०० ते ४००० रुपये झाली आहे. स्टीलच्या दरात ४००० ने वाढ होऊन ती ४५,००० रुपये टन झाली आहे.
एवढेच नाही, तर मजुरीच्या दराने आकाशाला गवसणी घातली आहे. ७५ ते ८० रुपये प्रतिस्क्वेअर फूट असणारे मजुरीचे दर आता १२५ ते १५० रुपयांवर पोहोचले आहेत. जमिनीच्या दराने तर उच्चांक केला असून, शहरी भागात प्रतिचौरस फूट १७०० ते १८०० रुपये, तर शहरालगतच्या ग्रामीण भागात हाच दर ११०० ते १२०० रुपये प्रतिचौरस फूट चालू आहे. यामुळे प्रतिगुंठा हा दर १२ लाख ते १८ लाख रुपये पडतो. या सर्वांचा विचार केल्यास केवळ १० Ÿ १० ची एक खोली बांधावयाची झाल्यास किमान लाख ते दीड लाख रुपये खर्च करावे लागत आहेत.
सध्या सिमेंटचे वाढलेले दर ही कृत्रिम दरवाढ आहे. रेल्वे बोगीतून येणारे सिमेंट विक्रेत्यांना वेळेवर मिळत नाही. यामुळे विक्रेते ट्रकने सिमेंट मागवत असल्यामुळे वाहतुकीच्या दरात मोठी वाढ होऊन त्याचा परिणाम सिमेंट दरवाढीवर झाला आहे.
- सुभाष ढवण, इंजिनिअर
मजुरीमध्ये बिगारीकाम करणारे लोकच मिळत नाहीत. त्याशिवाय कुशल कारागीरांची संख्याही घटली आहे. त्यामुळे मजुरीवाढ देणे भाग पडत आहे. याचा परिणाम इमारतीच्या बांधकाम दरावरही होत आहे.
- चंद्रकांत पाटील
बांधकाम व्यावसायिक