‘घर-वापसी’ मोहीम सुरूच राहणार
By admin | Published: January 28, 2015 12:36 AM2015-01-28T00:36:44+5:302015-01-28T01:01:09+5:30
व्यंकटेश आबदेव : विश्व हिंदू परिषद सुवर्णमहोत्सवी सोहळा
कोल्हापूर : गेल्या अनेक शतकांत हिंदू धर्मियांचे मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांमध्ये धर्मांतर झाले. अशा धर्मांतरित हिंदूंना परत आणण्याचे काम ‘घर-वापसी’च्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद करत आहे. ‘घर-वापसी’ आणि धर्मांतर यामध्ये फरक आहे. ‘घर-वापसी’चे काम सुरूच राहणार असून, धर्मांतर बंदी कायद्यासाठी मात्र व्हीएचपी ठाम आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी केले. विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विशाल हिंदू संमेलनात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिंंदू रणरागिनी साध्वी बालिका सरस्वती उपस्थित होत्या. येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर काल, सोमवारी सायंकाळी हे संमेलन झाले.
साध्वी बालिका सरस्वती यांनी मुस्लिमांचे आरक्षण बंद केले पाहिजे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘व्होट बँके’साठी मुस्लिमांचे सुरू असलेले लांगुनचालन थांबवले पाहिजे, गो हत्या करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी, ‘लव्ह जिहाद’ रोखावा, भारताच्या फाळणीस महात्मा गांधी जबाबदार असल्यामुळे चलनी नोटावर गांधीजींऐवजी छत्रपती शिवरायांची प्रतिमा छापावी, अशी आक्रमक भूमिका मांडली.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांतसंघटन मंत्री भाऊराव कुदळे, बजरंग दलाचे नेते शंकर गायकर पू. पू. ईश्वर महास्वामी, संतोष तथा बाळ महाराज, आदींची भाषणे झाली. यावेळी विश्व हिंंदू परिषद कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कॅ. प्रभाकर सावंत, जिल्हा मंत्री जवाहर छाबडा, सहमंत्री श्रीकांत पोतनीस, न्यूझीलंडचे खासदार महेश बिंद्रा आमदार राजेश क्षीरसागर, बंडा साळोखे, महेश उरसाल, महेश जाधव, अॅड. पंडित सडोलीकर, आदी उपस्थित होते.
साध्वींचा नथुराम बाणा
महात्मा गांधीजींनी भारताची फाळणी करून देशाची वाट लावली. देशाला त्यांच्या शांतीच्या मार्गाची नाही, तर क्रांतीची गरज आहे. साबरमती के संत अर्थात गांधीजींनी कोणतीही कमाल-बिमाल केली नाही, असा सरळसरळ नथुराम गोडसे बाणाही साध्वी सरस्वतींनी दाखविला. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यामुळे हिंदुत्ववादी शक्तींची आक्रमकता प्रचंड वाढल्याचे साध्वी सरस्वती, तसेच अन्य कार्यकर्त्यांच्या भाषणांतून दिसून आले.