वृत्तपत्र विक्रेते नामदेव गडदे यांचा प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 11:42 AM2020-12-10T11:42:09+5:302020-12-10T11:45:33+5:30
Kolhapurnews, Kolhapurnews शाहूपुरी परिसरात रस्त्यावर सापडलेले एक तोळ्याचे मंगळसूत्र हे वृत्तपत्र विक्रेते नामदेव मकाजी गडदे यांनी घोलप कुटुंबीयांना मंगळवारी (दि. ८) प्रामाणिकपणे परत केले. याबद्दल या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.
कोल्हापूर : शाहूपुरी परिसरात रस्त्यावर सापडलेले एक तोळ्याचे मंगळसूत्र हे वृत्तपत्र विक्रेते नामदेव मकाजी गडदे यांनी घोलप कुटुंबीयांना मंगळवारी (दि. ८) प्रामाणिकपणे परत केले. याबद्दल या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.
येथील म्हाडा कॉलनीमध्ये राहणारे ६४ वर्षीय गडदे हे राजारामपुरी डेपोचे वृत्तपत्र विक्रेते आहेत. शाहूपुरी परिसरामध्ये ते वृत्तपत्रांचे वितरण करतात. नेहमीप्रमाणे सोमवारी हे काम करताना शहाजी लॉ कॉलेज ते जिल्हा बँक या रस्त्यावरील एका अपार्टमेंटच्या परिसरात सकाळी आठ वाजता त्यांना रस्त्यावर मंगळसूत्र सापडले.
त्यांनी या परिसरात त्याबाबत विचारणा केली. त्यावर तेथील रिक्षाचालक असणाऱ्या घोलप कुटुंबातील हे मंगळसूत्र असून ते विवाह सोहळ्यातील मुहूर्तमेढ कार्यक्रमाच्या वेळी हरविले असल्याचे गडदे यांना समजले.
त्यांनी मंगळवारी घोलप यांना ते परत दिले. दरम्यान, सकाळी वृत्तपत्रांचे वितरण केल्यानंतर गडदे हे दिवसभर ताराबाई पार्क येथील एका कोल्ड्रिंक्सच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करतात. गेल्या अडीच वर्षांपासून ते येथे कार्यरत आहेत. यापूर्वी शिवाजी उद्यमनगर, लक्ष्मीपुरी परिसरातील एका दुकानात ते कार्यरत होते. त्या ठिकाणी सापडलेले पाच तोळ्यांचे गंठण, मोबाईल आणि काही ग्राहकांनी गडबडीत बिल अदा करताना दिलेले जादा पैसेही गडदे यांनी प्रामाणिकपणे परत केले आहेत.
कष्ट करून जे मिळते त्यामध्ये मी समाधानी आहे. त्यामुळे अनेक वेळा सापडलेले दागिने, मोबाईल, जादा मिळालेले पैसे ज्या-त्या व्यक्तींना मी परत करतो. त्यातून एक वेगळे समाधान मिळते.
- नामदेव गडदे,
वृत्तपत्र विक्रेते