हनीट्रॅप : चॅटिंग, मीटिंगनंतर लुबाडणुकीचे 'सेटिंग'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 11:16 AM2021-11-24T11:16:48+5:302021-11-24T11:17:21+5:30
तानाजी पोवार कोल्हापूर : पैसेवाल्या तरुणांना हेरुन मोबाईलवर चॅटिंगनंतर संपर्क, जवळीक अन त्या तरुणीच्या संपर्कातील सराईत टोळींकडून व्यावसायिकाला गाठून ...
तानाजी पोवार
कोल्हापूर : पैसेवाल्या तरुणांना हेरुन मोबाईलवर चॅटिंगनंतर संपर्क, जवळीक अन त्या तरुणीच्या संपर्कातील सराईत टोळींकडून व्यावसायिकाला गाठून बदनामी थांवविण्याच्या बदल्यात होणारी आर्थिक लुबाडणूक. हेच ‘हनीट्रॅप’चे तंत्र अवलंबून कोल्हापूर शहरात सद्या गुन्हेगारांच्या तीन टोळ्या सक्रीय असून जिल्ह्यात सुमारे सहा टोळ्यांमार्फत बडे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, कापड व्यापारी, मसाला व्यापारी, कारखानदार यांना ‘ट्रॅप’ केल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत पुढे आली. गुंडांनी अनेक व्यावसायिकांची करोडो रुपयांची पिळवणूक झाल्याचे समोर आले, पण तक्रारीसाठी कोणीही पुढे नसल्याचे प्राथमिक चित्र आहे.
महिन्यापूर्वी यड्राव, शाहूनगर येथे हनीट्रॅपच्या घटना घडल्या, पण त्याबाबत पोलीस खात्याला त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही. पण आठवड्यापूर्वी कोल्हापूरच्या साखर व्यापा-याला मुंबईत हनीट्रॅप केल्याचे उघड झाल्याने या लुबाडणुकीला वाचा फुटली, अन् पाठोपाठ कोल्हापूर शहरात कापड व्यापा-याला अडीच लाखाचा चूना लावत ‘हनीट्रॅप’ केल्याचे उघड झाले. त्यातून सहा गुन्हेगार गजाआड घातले अन पोलिसांची यंत्रणा कामाला लागली. प्राथमिक तपासात गुन्हेगारांच्या तीन टोळ्यांनी झटपट पैसे मिळवण्यासाठी शहरात ‘हनीट्रॅप’ करून अनेक व्यापा-याला लुबाडल्याची माहिती पुढे आली.
दोन महिलांचा समावेश
सद्या शहरातील तीन टोळींची माहिती पोलिसांच्या हाती लागली असली तरीही ‘हनीट्रॅप’साठी एक महिला व एका अल्पवयीन तरुणीचा वारंवार वापर केल्याचे तपासात पुढे आले. त्यांच्या शोधासाठी पोलीस विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.
पेठातील तरुणांचा गुंडगिरीसाठी वापर
‘हनीट्रॅप’ करणा-या गुन्हेगारांच्या टोळीत कोल्हापूर शहरातील नामवंत पेठातील तसेच प्रमुख चौकातील काही तरुणांचा समावेश असल्याचेही तपासात पुढे आले. त्यातील काहींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
तंबाखू, मसाला व्यापारी टार्गेट
कोल्हापूर जिल्ह्यातील एक तंबाखू व्यापारी, मसाला व्यापारी ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून या गुंडांच्या टोळीने लाखो रुपये उकळले आहेत. काही व्यापा-यांची गेली दोन-अडीच वर्षे आर्थिक पिळवणूक होत आहे. पण बदनामी होण्याच्या भीतीने ते तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. पोलीस तक्रारदारांपर्यंत पोहचले, नावे गोपनीय ठेवण्याचाही शब्द दिला, तरीही तक्रारीसाठी फसलेले पुढे येत नसल्याची शोकांतिका आहे.
हिलस्टेशन, महामार्ग, फ्लॅटमध्ये लुबाडणूक
कोल्हापूर शहरापासून उत्तरेकडे अवघ्या २५ ते ३० किमी अंतरावरावर हिलस्टेशनमधील हॉटेलमध्ये, राष्ट्रीय महामार्गावर, एमआयडीसीतील कारखान्यात याशिवाय काही लॉज, हॉटेलसह खासगी फ्लॅटवरही बड्या व्यापार्यांना ‘हनीट्रॅप’ केल्याचेही चौकशीत आढळले.
तक्रार देण्यासाठी पुढे यावे यासाठी पोलीस फसलेल्यांच्या घरी चकरा मारत आहेत. अनेक फसलेल्या व्यापा-यांनी आपले फोन बंद ठेवले, त्यामुळे माहिती मिळूनही पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकलेले नाहीत.
२०१७ पासून ‘हनीट्रॅप’
सराईत गुंडाच्या टोळ्याकडून २०१७ पासून पोलिसांना गाफील ठेवून ‘हनीट्रॅप’ होत असल्याचे सत्य पोलिसांच्या चौकशीतच उघड झाले. पण फसलेल्या व्यापा-यांनी गुन्हेगारांच्या भीतीने तोंड बंद ठेवल्याने पोलीसही ‘हनीट्रॅप’ करणा-यांपासून दूरच राहिले. त्यामुळे अनेकजण बळी पडले आहेत. आताच या प्रकरणाला वाचा फुटल्याने गुन्हेगारांना शोधण्यासाठी, तसेच फसलेल्यांची तक्रार देण्यासाठी मानसिकता करण्यासाठी पोलिसांची पळापळ सुरू झाली.