छत्रपतींच्या दोन्ही गादींचा सन्मान करा, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 02:19 PM2024-05-02T14:19:19+5:302024-05-02T14:21:21+5:30
''जिथे चिन्ह नाही, तिथे मोदी यांचा प्रचार''
इचलकरंजी : कोल्हापूर आणि सातारा या छत्रपतींच्या दोन्ही गादींचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. समाजाने त्यांना सहकार्य केले पाहिजे. ज्याला पाडायचे आहे, त्याला इतक्या ताकदीने पाडा की पुढील पाच पिढ्या तो निवडणुकीस उभा राहता कामा नये, या शब्दांत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत मराठा समाजाला आवाहन केले.
जरांगे-पाटील म्हणाले, छत्रपतींच्या गादींचा सन्मान म्हणून त्यांना समाजाने सहकार्य केले पाहिजे. सहकार्य करायचे की नाही, हे समाजाच्या हातात आहे. ते त्यांनीच ठरवावे. त्यामध्ये भाजप अथवा महाविकास आघाडी याचा कोणताही संबंध नाही. संपूर्ण राज्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. एका कोणत्याही उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला नाही. तसेच उमेदवार उभाही केलेला नाही. उभे राहण्यापेक्षा उमेदवार पाडण्यात लई मोठा विजय आहे. पाडण्याचेही मराठ्यांनी शिकले पाहिजे. ज्याला पाडायचे आहे, त्याला पाडा. जशी मराठ्यांच्या एकीची भीती आहे, तशी मराठ्यांच्या मतांचीही भीती वाटली पाहिजे. पत्रकार परिषदेस शहाजी भोसले, संतोष सावंत, अरविंद माने, वैभव खोंद्रे, नितीन पाटील, प्रकाश बरकाळे उपस्थित होते.
जिथे चिन्ह नाही, तिथे मोदी यांचा प्रचार
ते म्हणाले, देशात पहिल्यांदा असे घडले आहे की, जिथे चिन्ह नाही, त्या मतदारसंघातही पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन दुसऱ्यांसाठी प्रचार करीत आहेत. त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्यावरही वेळ आणली. पंतप्रधान प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात येऊन सभा घेत आहेत. मराठ्यांच्या एकजुटीमुळेच हे शक्य झाले आहे. राज्यात ४८ मतदारसंघ असतानाही पाच टप्प्यात मतदान घेतले. कारण, पंतप्रधान मोदी यांना प्रचाराला आणता यावे. छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचे वाटोळे केले. त्यांना ओबीसी धनगर समाज यांचा प्रश्न सोडविता आलेला नाही.
..तर विधानसभेच्या सर्व जागांवर उमेदवार देणार
आम्हाला लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्यास वेळ नव्हता. अचानक कोणाला तरी उभे करणे आणि मीच उभा केलेला समाज मातीत घालणे योग्य नाही. त्यामुळे निवडणूक लढविली नाही. मराठा कुणबी एकच असल्याचा सग्यासोयऱ्यांचा कायदा ६ जूननंतर सरकारने पारित केला नाही, तर मराठा विधानसभेच्या मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही. सर्व जाती-धर्माचे २८८ उमेदवार त्यावेळी उभे केले जातील, असे त्यांनी जाहीर केले.