हैदराबादच्या राष्ट्रीय कार्यशाळेत हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतीचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 03:58 PM2022-08-24T15:58:53+5:302022-08-24T16:09:58+5:30
विधवा महिलांसंदर्भात केलेल्या सन्मान ठरावाची दखल राष्ट्रीय कार्यशाळेत घेण्यात आली.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (ता. शिरोळ) आणि माणगाव (ता. हातकणंगले) या दोन ग्रामपंचायतींनी विधवा महिलांसंदर्भात केलेल्या सन्मान ठरावाची दखल हैदराबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत मंगळवारी घेण्यात आली.
भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण विकास तथा पंचायती राज संस्था या संस्थेच्या वतीने सोमवारपासून ही तीन दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात कोल्हापूर जिल्ह्यातील सहभागी प्रतिनिधीने या दोन गावांनी केलेल्या विधवांच्या सन्मान ठरावाची माहिती अन्य राज्यातील उपस्थित प्रतिनिधींना दिली. त्यावेळी अशा पद्धतीचा ठराव करणाऱ्या या दोन ग्रामपंचायतींचे टाळ्या वाजवून कौतुक करण्यात आले.
गावपातळीवर महिला आणि मुलींना सन्मान मिळावा, यासाठी केंद्र शासन आग्रही असून, यासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि ग्रामपंचायतींची भूमिका याबाबत पश्चिम बंगालमधील डॉ. सुपर्णा गांगुली यांनी ऑनलाइन मार्गदर्शन घेतले.
या दोन ग्रामपंचायतींनी विधवा सन्मानाचा ठराव केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये असे ठराव करण्याचा आवाहन केले होते. त्यालाही सर्वत्र प्रतिसाद मिळाला. एवढेच नव्हे तर अनेक गावांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजवंदन व अन्य उपक्रमांमध्ये उद्घाटन, ध्वजारोहण यासाठी विधवा महिलांना प्राधान्य देण्यात आले. या सर्व बाबींची हैदराबाद येथील या कार्यशाळेमध्ये दखल घेण्यात आली.