घोडेबाजारला लगाम घालू

By admin | Published: November 10, 2015 12:33 AM2015-11-10T00:33:51+5:302015-11-10T00:34:08+5:30

मुश्रीफ, सतेज पाटील : विरोधकांनी मोठे मन दाखवून बिनविरोध निवड करावी

Hood market | घोडेबाजारला लगाम घालू

घोडेबाजारला लगाम घालू

Next


कोल्हापूर : काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने विरोधकांनी नगरसेवकांत अस्थिरता पसरवू नये, तसेच मोठे मन दाखवून महापौर-उपमहापौर निवडणूक बिनविरोध करावी, असे माजी मंत्री सतेज पाटील यांनी आवाहन केले, तर महापौर निवडणुकीत विरोधकांनी घोडेबाजार सुरू केल्यास त्याला आम्ही लगाम घालू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांची बैठक सोमवारी रात्री येथील महालक्ष्मी लॉनवर झाली. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील हे प्रमुख उपस्थित होते. सतेज पाटील म्हणाले, विरोधी आघाडीला आव्हान देत आम्ही दोन्ही पक्षांनी ४४ हा बहुमतांचा आकडा गाठला आहे. दिवाळी तोंडावर असल्याने विरोधकांनी नगरसेवकांना भूलथापा लावून त्यांच्यात अस्थिरता निर्माण करू नये. काही शंका वाटल्यास नगरसेवकांनी नेत्यांना थेट फोन करावा. आज, मंगळवारी महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरू, सत्ता आपलीच आहे, मतदानदिवशी १६ नोव्हेंबरला सर्व नगरसेवकांनी कुठे एकत्र जमायचे हे नंतर ठरवू, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांची तत्त्वे एकच असल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. महापौर निवडीवेळी पक्षाचा कोणीही नगरसेवक फुटणार नाही, फुटलाच तर त्याचे नगरसेवकपद जाणार आहे. तरीही कोणीही फुटणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, शहरवासीयांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बाजूने कल दिला आहे. समविचारी पक्षाशी आघाडी केली आहे. महापौर निवडणुकीत दगा-फटका होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. पक्षाचा व्हीप बजावला जाणार आहे. घोडेबाजारला आपण लगाम घालण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड. सुरेश कऱ्हाडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी महापौर वैशाली डकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, सरचिटणीस प्रकाश सातपुते, आजी आमदार के. पी. पाटील, काँग्रेसच्या महिला शहरप्रमुख संध्या घोेटणे, भैया माने, आदी नेत्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, अपक्ष नगरसेवक राहुल माने, नीलोफर आजरेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Hood market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.