‘हौद’ १५ एप्रिलपूर्वी पाडणार
By admin | Published: April 7, 2016 12:10 AM2016-04-07T00:10:36+5:302016-04-07T00:16:54+5:30
आयुक्त : पर्यायी शिवाजी पुलाच्या अडथळ्याबाबत कृती समितीला आश्वासन
कोल्हापूर : येत्या दहा दिवसांत ‘हेरिटेज कमिटी’शी पत्रव्यवहार करून शिवाजी पूल येथील हौद पाडण्याची कार्यवाही करून १५ एप्रिलपर्यंत ही जागा मोकळी करून देऊ, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी दिले. कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने महापौर अश्विनी रामाणे व आयुक्तांची भेट घेऊन शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे रखडलेले बांधकाम व हद्दवाढीच्या निर्णयाचे काय झाले याची विचारणा केली. यावेळी ते बोलत होते.
कृती समितीच्यावतीने निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, ‘शिवाजी पुलास १२५ वर्षे पूर्ण झाली असून, हा पूल पडल्यास त्यास आयुक्त म्हणून आपणास जबाबदार धरले जाईल. नव्या पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. अडथळा ठरणारी १२ झाडेही प्रत्येकी दोन हजार रुपये व प्रत्येक झाडापाठीमागे तीन ट्री गार्ड देण्याची अटही मान्य केली आहे. तरीही या नव्या पुलास अडथळा ठरणारा हौद पाडला जात नाही. विशेष म्हणजे हा हौद ‘हेरिटेज’च्या यादीत नाही. यापूर्वीही उमा टॉकीज, पाण्याचा खजिना, लक्ष्मीपुरी येथील हौद पाडले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने हा हौद तेथून काढून दुसरीकडे बांधून घ्यावा आणि त्याचा खर्च आपल्या खात्याकडून घ्यावा, असा पत्रव्यवहार महापालिकेकडे केला आहे. त्यामुळे हा हौद तेथून त्वरित काढून घ्या, त्यानंतर आम्ही पुलाचे रखडलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा करू.’
सहायक नगररचनाकार धनंजय खोत यांनी हा हौद पुरातत्त्व खात्याच्या परवानगीने पाडावा लागेल, असे सांगितले. यादीत नसताना हा हौद का पाडत नाही अशी विचारणा कृती समितीच्या बाबा पार्टे, नामदेव गावडे, दिलीप पोवार, आदींनी केली. आयुक्तांनी हस्तक्षेप करीत प्रथम पुरातत्त्व खात्याशी पत्रव्यवहार करून कार्यवाही करू, परंतु त्यासाठी दहा दिवसांची मुदत द्या, असे कृती समितीला सांगितले. त्यावर समाधान न झाल्याने दहा दिवसांत हौद पाडाच, असा आग्रह समितीने धरला. अखेर आयुक्तांनी दहा दिवसांत याबाबत पत्रव्यवहार करून हौद पाडण्याची कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.
यावेळी महापौर रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, उपायुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, नगरसेवक संभाजी जाधव, शारंगधर देशमुख, नगरसेविका वृषाली कदम, नियाज खान, अशोक जाधव, अॅड. पंडितराव सडोलीकर, किशोर घाटगे, अशोक भंडारे, संभाजीराव जगदाळे, एस. के. माळी, बाबूराव कदम, पद्माकर कापसे, प्रसाद पाटील, श्रीकांत भोसले, अॅड. चारूलता चव्हाण, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते.
हद्दवाढीसाठी सुधारित बजेटमध्ये दोन कोटींची विशेष तरतूद
हद्दवाढीची मागणी गेली कित्येक वर्षांची आहे. त्यात ज्या गावांचा समावेश होणार आहे, हे माहीत असूनही प्रशासनाने त्या गावांबाबत २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात विशेष दोन कोटींची तरतूद का केली नाही, असा सवाल कृती समितीने आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापती यांना विचारला.
यामधील गावे व दोन एम.आय.डी.सी.ंचा समावेश आहे. गावांकरिता प्रत्येकी १० लाख, तर दोन एम.आय.डी.सी.ंना प्रत्येकी २५ लाख द्यावेत. यावर आयुक्तांनी राज्य शासनाचा याबाबत निर्णय झालेला नव्हता; पण उपसूचना घालून सुधारित बजेटमध्ये ही तरतूद केली जाईल, असे आश्वासनही कृती समितीला दिले.