हुपरी बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:13+5:302021-04-28T04:27:13+5:30
हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज, मंगळवारपासून भरविण्यात येणारी यात्रा कोरोना महामारीच्या ...
हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज, मंगळवारपासून भरविण्यात येणारी यात्रा कोरोना महामारीच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे. तरीही यात्रेनिमित्ताने जर कुणाच्या घरी पाहुणे आल्यास प्रतिपाहुणा ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय मंगळवारी दुपारी झालेल्या ग्राम कोरोना नियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता हजारे होत्या.
यळगूडचे ग्रामदैवत श्री हनुमान देवाची यात्रा प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने यावर्षीची यात्रा भरविण्याबाबत निर्बंध आल्याने याबाबतचा निर्णय घेण्यासाठी मंगळवारी दुपारी ग्राम कोरोना नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. शासन नियमाला अनुसरून यात्रा भरविण्यात येऊ नये. यात्रेनिमित्त कोणतेही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. तसेच यात्रेसाठी कोणाच्याही घरी पाहुणे व मित्रमंडळींना आमंत्रित करू नये. जर कुणाच्या घरी पाहुणे किंवा मित्रमंडळी आल्यास प्रति व्यक्ती ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी सरपंच सुनीता हजारे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कांबळे, गाव कामगार तलाठी आरती चौगुले, पोलीसपाटील प्रकाश सदाशिव लोहार, सुनील तुकाराम माळगे, मुख्याध्यापिका प्रमिला चव्हाण, नसिमा मुजावर, आदी ग्राम कोरोना नियंत्रण समिती सदस्य उपस्थित होते.