आशा, गटप्रवर्तकांचा पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 06:48 PM2021-07-05T18:48:16+5:302021-07-05T18:49:27+5:30
Health Worker Kolhapur: आशा, गटप्रवर्तकांना ग्रामपंचायतीकडून मिळणारा एक हजार रुपयांचा प्रोत्साहनपर भत्ता एप्रिलपासून मिळावा, यासह विविध २२ मागण्यांसंबंधी सकारात्मक विचार न केल्यास येत्या दहा दिवसांत जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करण्याच्या इशाऱ्याचे निवेदन जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनतर्फे सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांना देण्यात आले. या वेळी युनियन पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यासंबंधी अधिकारी साळे यांच्याशी चर्चा केली.
कोल्हापूर : आशा, गटप्रवर्तकांना ग्रामपंचायतीकडून मिळणारा एक हजार रुपयांचा प्रोत्साहनपर भत्ता एप्रिलपासून मिळावा, यासह विविध २२ मागण्यांसंबंधी सकारात्मक विचार न केल्यास येत्या दहा दिवसांत जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करण्याच्या इशाऱ्याचे निवेदन जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनतर्फे सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांना देण्यात आले. या वेळी युनियन पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यासंबंधी अधिकारी साळे यांच्याशी चर्चा केली.
ऐन कोरोनाच्या काळात गेल्या महिन्यात मानधन वाढीसह विविध मागण्यासंबंधी आशा आणि गटप्रवर्तकांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन दिले. याचे अधिकृत पत्र अजून जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे उपलब्ध झालेले नाही. शिवाय यापूर्वीच्या प्रलंबित मागण्याही ह्यजैसे थेह्णच आहेत. यामुळे युनियनतर्फे पुन्हा एकदा निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले.
शहर आणि ग्रामीण भागात ३५०० हून अधिक आशा आणि १४१ गटप्रवर्तक आहेत. यातील अनेक गटप्रवर्तक उच्चशिक्षित आहेत. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, दरमहा दहा हजार रुपये वेतन मिळावे, कोरोनाच्या कामाचा प्रोत्साहन भत्ता आशा स्वयंसेविका इतकाचा गटप्रवर्तकांनाही मिळावा, मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज, सनकोट मिळावे, संप कळातील मानधन कपात करू नये, कंत्राटी पदावरील गटप्रवर्तकांची नियुक्ती कायमस्वरूपी करावी, शासकीय कामकाजासाठी लॅपटॉप मिळावा, डिसेंबरपासूनचा थकीत कोरोना भत्ता मिळावा, आशा, गटप्रवर्तकांना केंद्र सरकारचे नियमित मानधन मिळावे, सोलापूरच्या धर्तीवर जिल्हा परिषद फंडातून प्रत्येक वर्षी २ हजार रुपये सन्मान निधी मिळावा, प्रलंबित प्रोत्साहन भत्ता मिळावा, यांच्यासह २२ मागण्यांकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले.
प्रत्येक मागणीवर चर्चा झाली. चर्चेत जिल्हा परिषद पातळीवरचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले. या वेळी जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या अध्यक्ष नेत्रदीपा पाटील, जिल्हा सचिव उज्ज्वला पाटील, खजिनदार संगीता पाटील, राधिका घाटगे, अनिता अनुसे, गीता गुरव, शुभांगी चेचर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.