एशियाडमध्ये वीरधवल, राहीकडून कोल्हापूरकरांना पदकाच्या आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:21 PM2018-08-18T17:21:04+5:302018-08-18T17:31:08+5:30
जाकार्ता (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियार्ई स्पर्धेत आॅलिम्पिकवीर गोल्डन बॉय जलतरणपटू वीरधवल खाडे, सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत या दोघांकडून पदक जिंकण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सांघिक स्पर्धेसाठी यंदाही या दोघांची निवड झाली आहे.
कोल्हापूर : जाकार्ता (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियार्ई स्पर्धेत आॅलिम्पिकवीर गोल्डन बॉय जलतरणपटू वीरधवल खाडे, सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत या दोघांकडून पदक जिंकण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सांघिक स्पर्धेसाठी यंदाही या दोघांची निवड झाली आहे.
देशाचा गोल्डनबॉय ठरलेल्या आॅलिम्पिकवीर वीरधवलने यापूर्वी २००६ मध्ये सहा सुवर्णपदकांसह पाच राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली होती. यासह त्याने युवा राष्ट्रकुल, आशियाई, तसेच राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये भारताचे अनेक वेळा प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
यात त्याने ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर फ्रीस्टाईल व ५० मीटर बटरफ्लाय अशा जलतरण प्रकारांत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेत सरकारने त्याला अर्जुनवीर सन्मानानेही गौरविले आहे. सध्या तो राज्य शासनाच्या महसुल विभागात तहसीलदार पदावर कार्यरत आहे.
जागतिक स्पर्धेत दीर्घकालानंतर अर्थात तो चार वर्षांनंतर सहभाग घेत आहे. भारतीय संघ निवड चाचणीतही त्याने चमकदार कामगिरी केली. ती कामगिरी पाहता यंदा ४ बाय १०० फ्रीस्टाईल रिले व ४ बाय २०० फ्रीस्टाईल रिलेमध्ये समावेश झाला आहे.
त्याच्यासोबत कोल्हापूरची राही सरनोबत हिनेही नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरकरांची परंपरा सुरू ठेवत आगेकूच केली आहे. तिने तेजस्विनी सावंत हिच्या पाउलावर पाऊल ठेवत कामगिरीचा आलेख उंचावला आहे. यापूर्वी तिने २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण, रौप्य, तर २०११ च्या आयएसएफ विश्वचषक शुटिंग स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे.
याच कामगिरीच्या जोरावर तिने आॅलिम्पिकचे तिकीटही पटकावले. २०१३ मध्ये तिने विश्वचषक शुटिंग स्पर्धेत सुवर्ण, तर २०१४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा सुवर्णचा वेध घेत देशाच्या मानात शिरपेच खोवला.
सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत पुन्हा एकदा तिची इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ती २५ मीटर पिस्तुल प्रकारात पुन्हा एकदा सहभागी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णकन्या राही व गोल्डनबॉय वीरधवल यांच्याकडून पदक विजयाच्या अपेक्षा कोल्हापूरच्या क्रीडा रसिकांच्या पुन्हा एकदा निर्माण झाल्या आहेत.