घरफाळा विभागाचे वरातीमागून घोडे, बंद केलेल्या ‘बिग बझार’वर सीलची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:12 AM2019-12-14T11:12:13+5:302019-12-14T11:18:59+5:30
उद्यमनगर येथील बिग बझार शुक्रवारी महापालिकेच्या घरफाळा विभागाने सील केला. दोन कोटी ५६ लाखांचा घरफाळा थकीत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, बिग बझार यापूर्वीच नूतनीकरणाच्या नावाखाली बंद केला आहे. दोन कोटींची थकबाकी असताना महापालिकेने इतके दिवस कारवाई करण्यास विलंब का लावला, असा सवालही उपस्थित होत आहे. तसेच घरफाळा विभागाचे काम म्हणजे वरातीमागून घोडे अशीही चर्चा महापालिकेत सुरू आहे.
कोल्हापूर : उद्यमनगर येथील बिग बझार शुक्रवारी महापालिकेच्या घरफाळा विभागाने सील केला. दोन कोटी ५६ लाखांचा घरफाळा थकीत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, बिग बझार यापूर्वीच नूतनीकरणाच्या नावाखाली बंद केला आहे. दोन कोटींची थकबाकी असताना महापालिकेने इतके दिवस कारवाई करण्यास विलंब का लावला, असा सवालही उपस्थित होत आहे. तसेच घरफाळा विभागाचे काम म्हणजे वरातीमागून घोडे अशीही चर्चा महापालिकेत सुरू आहे.
महापालिकेच्या विविध विभागांच्या वसुलीमध्ये तूट आली आहे. दिलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यानुसार सर्व विभागांनी थकीत वसुलीचा धडका लावला आहे. यामध्ये घरफाळा विभागानेही थकीत घरफाळा असणाऱ्या मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी बिग बझार घरफाळा थकबाकीप्रकरणी सील केला.
जागामालकाने सांगितल्यानंतर महापालिकेला आली जाग
घरफाळा थकबाकी असलेल्या मिळकतींनी कराची रक्कम जमा करावी, अन्यथा मिळकत सील करून त्यांच्यावर बोजा नोंद करण्यात येईल, अशा नोटिसा मागील आठवड्यामध्ये थकीत मिळकतींना पोस्टाने दिल्या आहेत. अशाच प्रकारे सुधारित कराची थकबाकी रक्कम जमा करावी म्हणून बिग बझार यांना ही नोटीस दिलेली होती. त्यांनी कराची रक्कम जमा न करता इतरत्र व्यवसाय स्थलांतरित करण्याची व्यवस्था सुरू केली. मिळकत मालक यांनी महापालिकेस लेखी पत्र देऊन कराची रक्कम वसूल करावी, असे कळविले. यानंतर घरफाळा विभाग खडबडून जागा झाला आणि त्यांनी सीलची कारवाई केली.
साहित्य स्थलांतर केल्यानंतर कारवाई
बिग बझार अचानक बंद करण्यात आला आहे. यानंतर शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. बझारच्या बाहेर नूतनीकरणामुळे बझार बंद असल्याचा फलक लावला आहे. तो दुसरीकडे स्थलांतरित करणार असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, बाजार व्यवस्थापनाने येथील बहुतांश साहित्य स्थलांतरित केले आहे. महापालिकेने साहित्यासह मिळकत सील केली असल्याचा दावा केला आहे.