वीज गेल्यास रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी- महावितरणचे आवाहन : तौक्ते वादळामुळे पुरवठ्यावर परिणाम शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:23 AM2021-05-16T04:23:42+5:302021-05-16T04:23:42+5:30
कोल्हापूर : संभाव्य ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा जर दुर्दैवाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला तडाखा बसल्यास वादळाच्या तीव्रतेनुसार विद्युत ...
कोल्हापूर : संभाव्य ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा जर दुर्दैवाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला तडाखा बसल्यास वादळाच्या तीव्रतेनुसार विद्युत यंत्रणेचे नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. कोविड काळात सर्व आरोग्य यंत्रणा व हॉस्पिटलच्या प्रशासनानेही त्यांची पर्यायी व्यवस्था ठेवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे. ग्राहकांनी सतर्क राहावे, विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अंकुर कावळे यांनी सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांनाही वादळानंतरची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. हवेचा वेग बघून अतिउच्च दाब वा इतर वाहिन्या तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संयम राखावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे.
नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा...
वीज ग्राहक व नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी २४ तास सेवेत असलेले टोल फ्री क्रमांक १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर तसेच कोल्हापूर व सांगली येथील नियंत्रण कक्षाचे क्रमांक अनुक्रमे ७८७५७६९१०३ आणि ७८७५७६९४४९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.