आरोग्य योजनेची २५० कोटींहून अधिक रुपयांची बिले थकीत, रुग्णांना लाभ मिळेना; उद्धवसेनेचा आरोप
By पोपट केशव पवार | Updated: April 5, 2025 18:52 IST2025-04-05T18:51:21+5:302025-04-05T18:52:41+5:30
रुग्णालयांची बिले द्या अन्यथा राज्यभर आंदोलन

आरोग्य योजनेची २५० कोटींहून अधिक रुपयांची बिले थकीत, रुग्णांना लाभ मिळेना; उद्धवसेनेचा आरोप
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेचा लाभ दिलेल्या रुग्णालयांची २५० कोटींहून अधिक रुपयांची बिले थकल्याने सर्वसामान्य रुग्णांना लाभ मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारने या रुग्णालयांची बिले त्वरित अदा करावीत अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व शहरप्रमुख सुनील मोदी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
पवार व मोदी म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजना सुरू केली, ही योजना सुरू करताना कोणतेही आर्थिक नियोजन केले नाही. याचा परिणाम आज विविध योजनांवर पडत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान आयुष्मान भारत योजना सुरू आहेत.
मात्र, सध्या या योजना बंद पडतील अशी स्थिती आहे. या दोन्ही योजनांचा लाभ दिलेल्या रुग्णालयांची बिले थकली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना लाभ मिळणे अवघड झाले आहे. या रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत रुग्ण घेणेच बंद केले आहे. परिणामी आरोग्यसेवेवर परिणाम होऊन जनतेच्या खिशातील पैसे आरोग्यावर खर्च होत आहेत. त्यामुळे सरकारने ही बिले त्वरित अदा करावीत अन्यथा राज्यभर आंदोलन उभा करू, असा इशारा पवार व मोदी यांनी दिला.