अपंग विद्यार्थ्यांंना मिळणार वसतिगृहाचा आधार

By admin | Published: February 10, 2016 12:18 AM2016-02-10T00:18:42+5:302016-02-10T01:09:33+5:30

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा : नांदणीच्या श्रावणबाळ विकलांग संस्थेचा पुढाकार -- गुड न्यूज

Hostel base for disabled students | अपंग विद्यार्थ्यांंना मिळणार वसतिगृहाचा आधार

अपंग विद्यार्थ्यांंना मिळणार वसतिगृहाचा आधार

Next

संदीप बावचे --जयसिंगपूर --दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत असतानाच याच दुष्काळग्रस्त भागातील अपंग विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा मानस शिरोळ तालुक्यातील श्रावणबाळ विकलांग सेवाभावी संस्थेचा आहे. जूनपासून सुमारे ५० विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. अपंग, अंध व मतिमंदासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने हा आणखी एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. सामाजिक बांधीलकी जोपासत शिरोळ तालुका व परिसरातील अपंगांना आधार देण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था नांदणी यांच्या माध्यमातून सुरू आहे. या संस्थेशी सलग्न असणारी श्रावणबाळ विकलांग सेवाभावी संस्थाही कार्य करीत आहे. संस्थेमार्फत शून्य ते अठरा वयोगटातील अपंग मुलांचे शिबिर व शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या जातात. त्याचबरोबर वर्षातून एकदा तीर्थक्षेत्र दर्शन घडविण्यासाठी शिखरजी यात्रेचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर अपंगांना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मेणबत्ती, उदबत्ती, कापूर तयार करणे, रेडिओ, टीव्ही, टेप, सीडी प्लेअर दुरुस्त करणे, मोटर वाईडिंग करणे, घड्याळ दुरुस्ती करणे, शिवणकाम, ब्युटी पार्लर, असे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येत आहे. संस्थेच्या या सर्व कार्यात त्यांच्या मदतीसाठी राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंडेशन, घोडावत ग्रुप, नांदणी गणेश बेकरी, मोदी हॉस्पिटल, रोटरी क्लब यांच्यासह अनेक सामाजिक संस्था नेहमी पुढाकार घेत असतात. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अपंगांना जयपूर फूट, त्यांच्या क्रीडास्पर्धाही भरविल्या जातात.
सामाजिक बांधीलकीचा हाच धागा पकडून संस्थेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे धोरण निश्चित केले आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले जाणार आहे. प्रारंभी दुष्काळी भागाचा दौरा करून त्याठिकाणी अपंग व गरजू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नांदणी येथे राहण्याची सोय वसतिगृहाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह सुरू केले जाणार असून, अपंग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तो घडावा असाही संस्थेचा हेतू आहे.

जून महिन्यापासून दुष्काळग्रस्त भागातील अपंग विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्यासाठी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आतापासून प्रयत्न सुरू केले असून, अपंग मुलांच्या वसतिगृहासाठी सामाजिक संस्था पुढाकार घेतील. शासनाची कोणतीही मदत आम्ही स्वीकारणार नाही.
- सतीश जांगडे
अध्यक्ष, श्रावणबाळ विकलांग संस्था.


एकमेव संस्था
शिरोळ तालुक्यातील नांदणीसारख्या ग्रामीण भागातून अपंग, अंध, मतिमंदांसाठी कार्यरत असलेली ही संस्था सामाजिक ऋण या भावनेतून काम करीत आहे. तालुक्यात अनेक सेवाभावी संस्था आहेत. मात्र, अपंग, अंध व मतिमंद व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी ही एकमेव संस्था म्हणून संबोधली जाते.

Web Title: Hostel base for disabled students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.