मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे

By admin | Published: May 1, 2017 01:14 AM2017-05-01T01:14:10+5:302017-05-01T01:14:10+5:30

मराठा महासंघाची आमसभा : चंद्रकांतदादांची घोषणा; जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात सुरू करणार

Hostel for Maratha students | मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे

मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे

Next



कोल्हापूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत्या जूनपासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करणार असून, त्याची घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमसभेत जाहीर केले. दरम्यान, मराठा स्वराज्य भवनसाठी सरकारी जागा आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापुरात मार्केट यार्डमधील राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृहात या मराठा आमसभेचे आयोजन केले होते. आमसभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक वसंतराव मोरे होते. प्रथम शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आमसभेतील उपस्थितांची संख्या पाहून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कौतुक केले. ते म्हणाले, आमसभेच्या निमित्ताने वेगळ्या कल्पना पुढे येत आहेत. गेल्याच आठवड्यात गोलमेज परिषद झाली. त्यांनीही नेतृत्व ठरवून राज्य शासनाशी चर्चेची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही चर्चेसाठी तयार आहेत; पण मराठा आरक्षणाबाबत चर्चेला येताना राज्य शासनाने आतापर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा अभ्यास करून पुढे यावे. या योजनांतील त्रुटीही दाखवून द्याव्यात. सरकारच्या हातात जितके देता येतील तितके निर्णय सरकारने घेतलेले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी येत्या जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे सुरू करणार असून, त्याची घोषणा येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, या वसतिगृहासाठी ज्यांच्याकडे इमारती नाहीत, अशांनी भाडेतत्त्वावर इमारती घेऊन ती वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. २५० मुलांची, तर २५० मुलींची संख्या असणारी वसतिगृहे असतील, अशी कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाचा लढा आजच्या परिस्थितीत न्यायालयात अडकला आहे. त्यासाठी राज्य शासनाने दिग्गज वकील दिले आहेत; त्यामुळे शासन या प्रक्रियेत प्रामाणिकपणे आपला लढा देत आहे असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या संघर्षाला दाद दिली पाहिजे; कारण या संघर्षामुळे शासनाला जाग आली आहे. मराठा समाजाने शिक्षण, व्यवसाय,खेळ, आदींना प्राधान्य देऊन आचारसंहिता तयार करून त्याचे गावागावांत प्रबोधन करण्याची गरज आहे.
मराठा भवन उभारणीच्या जागेबाबत मंत्री पाटील म्हणाले, ‘आदर्श’ प्रकरणानंतर सरकारी जागा खासगी वापरासाठी देणे महाकठीण काम झाले आहे. तरीही त्यासाठी आपण प्रयत्न करू. त्या जागांबाबत आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबत पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, डॉ. बी. एम. हिर्डेकर, माजी आमदार के. पी. पाटील, सुरेश साळोखे, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, चंद्रकांत जाधव, शैलेजा भोसले, अंजली समर्थ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गुणात्मक आणि घटनात्मकरीत्या टिकणारेच आरक्षण हवे : कोंढरे
आरक्षणासाठी देशात अनेक हिंसक आंदोलने झाली. त्यानंतर नऊ राज्यांत आरक्षणाचे निर्णय घेतले; परंतु नंतर त्यांना न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे न्यायालयातील लढाई ही तलवारीने नाही, तर गुणवत्तेवरच लढावी लागते. मराठा समाजासाठी गुणवत्ता आणि घटनात्मकरीत्या टिकेल असेच आरक्षण हवे आहे. त्यासाठी मराठा समाजातील अभ्यासू व विचारवंतांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोेंढरे यांनी केले.

Web Title: Hostel for Maratha students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.