कोल्हापुरात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांचा राहण्याचा प्रश्न सुटणार, बालकल्याण संकुल उभं करतयं वसतिगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 12:07 PM2022-01-15T12:07:43+5:302022-01-15T12:11:47+5:30

समाजाने दिलेल्या देणगीतूनच बालकल्याण संकुलातर्फे काम करणाऱ्या महिलांसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाची टोलेजंग इमारत उभी राहत आहे.

Hostel setting up child welfare complex for working women in kolhapur | कोल्हापुरात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांचा राहण्याचा प्रश्न सुटणार, बालकल्याण संकुल उभं करतयं वसतिगृह

कोल्हापुरात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांचा राहण्याचा प्रश्न सुटणार, बालकल्याण संकुल उभं करतयं वसतिगृह

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : समाजाने दिलेल्या देणगीतूनच येथील बालकल्याण संकुलातर्फे काम करणाऱ्या महिलांसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाची टोलेजंग इमारत उभी राहत आहे. संस्थेच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत देणगीतूनच ६९ लाख ५६ हजार रुपये समाजातून उभे राहिले आहेत. परंतु ही इमारत पूर्ण होण्यासाठी अजून किमान दीड कोटी रुपयांची गरज असून त्यासाठी संस्थेने समाजाकडेच पदर पसरला आहे.

संस्थेचे आश्रयदाते प्रसिद्ध आर्किटेक्ट निरंजन वायचळ यांनी संस्थेचा आराखडा निश्चित करून दिला आहे. संस्थेचे विश्वस्त व्ही. बी. पाटील हे आपल्या घरचे काम असल्याप्रमाणे रोज न चुकता जावून कामावर देखरेख करत आहेत. धनराज पवार हे बांधकाम कंत्राटदार त्याचे काम करत आहेत.

येथील बालकल्याण संस्थेतर्फे सुमारे अडीचशे अनाथ, निराधार, एक पालक असलेल्या मुला-मुलींचे संगोपनाचे काम आईच्या मायेने केले जात आहे. या संस्थेला दिलेला पैसा कारणी लागतो अशी समाजाची धारणा असल्याने लोक मोठ्या संख्येने देणगी देतात. त्यातूनच संस्थेचा संसार चालतो.

शासनाने वीस वर्षांपूर्वी ताराराणी चौकातून शिरोली नाक्याकडे जाण्याऱ्या रस्त्यावर राजेश मोटर्सच्या समोरील बाजूस १० गुंठ्याचा भूखंड संस्थेस दिला होता. त्यावर बरेच अतिक्रमण झाले होते. ते काढून त्या जागेवरच हे वसतिगृह बांधण्यात येत आहे. संस्थेबद्दल समाजमनात चांगली प्रतिमा निर्माण झाल्यामुळे बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या मुली-महिलांची संस्थेत राहण्यासाठी सोय आहे का, म्हणून रोज विचारणा होते.

सध्या या संस्थेत पीडित महिलांनाच प्रवेश दिला जातो. नोकरीसाठी आलेल्या महिलांना राहण्याची सोय नाही. त्यामुळे ही गरज लक्षात घेऊन संस्थेने हे वसतिगृह बांधण्याचे काम हाती घेतले आहे. समाजाच्या मदतीतूनच समाजासाठीच काम असे असावे असे त्याचे स्वरुप आहे. म्हणून राहिलेल्या कामासाठी मदत करण्याचे आवाहन संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मा तिवले यांनी केले आहे.

५० महिलांची सोय

या वसतिगृहात ५० महिलांची सोय होऊ शकेल. तिथे अधीक्षक निवास असेल. खालील बाजूस दोन गाळे भाड्याने दिले जाणार आहेत. २५ जून २०२० ला तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते इमारतीचे काम सुरु झाले आहे.

असेही अनुभव..

निवृत्त तुरुंगाधिकारी टी.एस. कुलकर्णी (रा.दुधाळी परिसर कोल्हापूर) यांनी बालकल्याणने असे काम हाती घेतल्याचे समजताच आपल्या दिवंगत पत्नी सुमन कुलकर्णी यांच्या नावे १५ लाखांची देणगी दिली. मुंबईची भारतीय बृहत समाज संस्था संस्थेला नेहमीच मदत करते. त्यांनीही बांधकाम काढल्याचे समजल्यावर तब्बल २५ लाखांची देणगी दिली. याशिवाय व्यक्तिगत १ हजारापासून एक लाखांपर्यंत देणगी देणारेही लोक आहेत.

दृष्टिक्षेपात खर्च

इमारतीचा एकूण खर्च : २ कोटी ५० लाख
आतापर्यंतचा खर्च : ८५ लाख ४५ हजार ९१३ रुपये
देणगीतून मदत : ६९ लाख ५६ हजार १०१.
अजून किती रकमेची गरज : सुमारे दीड कोटी

Web Title: Hostel setting up child welfare complex for working women in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.