राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांतील वसतिगृहे अद्ययावत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:27 AM2021-09-27T04:27:03+5:302021-09-27T04:27:03+5:30

कोल्हापूर : राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांतून शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढे शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करतात. हे विद्यार्थी देश, राज्याचे ...

The hostels in all the agricultural colleges in the state will be updated | राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांतील वसतिगृहे अद्ययावत करणार

राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांतील वसतिगृहे अद्ययावत करणार

googlenewsNext

कोल्हापूर : राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांतून शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढे शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करतात. हे विद्यार्थी देश, राज्याचे भविष्य आहे. त्यांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या विद्यापीठे, महाविद्यालयांतील वसतिगृहांचा येत्या १५ दिवसांत आढावा घेऊन आवश्यक सुविधांसह ही वसतिगृहे अद्ययावत केली जातील, असे प्रतिपादन कृषिमंत्री आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादा भुसे यांनी रविवारी येथे केले.

येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात श्री भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून बांधलेल्या ‘राजमाता विजयाराजे सिंधिया विद्यार्थिनी वसतिगृहा’च्या नव्या इमारतीचे उ्दघाटन मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, महेश शिंदे, भास्कराचार्य प्रतिष्ठानचे स्थानिक अध्यक्ष प्रा. डॉ. भारत खराटे प्रमुख उपस्थित होते. सामाजिक भावनेतून चांगल्या सुविधा असलेल्या वसतिगृह कोल्हापुरात उभारले आहे. या वसतिगृहाच्या इमारतीचा आणखी एक मजला वाढविण्यासाठी निधी देण्यात येईल. कृषी अभ्यासक्रमासाठी सध्या ५२ टक्क्यांहून अधिक मुली प्रवेशित होत आहेत. त्यांना चांगल्या सुविधा, सुरक्षित कॅम्पस उपलब्ध करून दिल्या जातील, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. एखाद्या उपक्रमासाठी सरकारी निधी मिळवायचा असल्यास दोन-तीन वर्षे फाइल फिरवावी लागते. त्याचा विचार करून या कृषी महाविद्यालयातील वसतिगृह सीएसआर फंडातून करण्याचे ठरविले. त्यात भास्कराचार्य प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन ते पूर्ण केल्याने चांगली इमारत उभारली. राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी आयुष्यभर शिक्षणक्षेत्रासाठी योगदान दिले. त्यामुळे त्यांचे नाव या वसतिगृहाला दिले असल्याचे माजी मंत्री पाटील यांनी सांगितले. मुलींच्या शिक्षणाला बळ देण्याच्या सामाजिक भावनेतून या वसतिगृहासाठी भास्कराचार्य प्रतिष्ठानने मदतीचा हात दिल्याचे प्रा. खराटे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, प्रा. डॉ. नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे, कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्ताजी उगले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले, बाळासाहेब यादव, आनंद पाटील, आदी उपस्थित होते. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी आभार मानले.

Web Title: The hostels in all the agricultural colleges in the state will be updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.