कोल्हापुरातील वसतिगृहे शाहू महाराजांच्या द्रष्टेपणाचे प्रतीक; डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे प्रतिपादन
By समीर देशपांडे | Published: December 16, 2023 07:11 PM2023-12-16T19:11:44+5:302023-12-16T19:14:10+5:30
डॉ. मुजुमदार यांनी कोल्हापूरमधील अनेक आठवणी जागविल्या
कोल्हापूर : सर्व समाजातील मुले शिकावीत यासाठी विविध जाती धर्माची वसतिगृहे उभारण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच हजारो मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. कोल्हापुरातील ही वसतिगृहे छत्रपती शाहू महाराजांच्या दृष्टेपणाचे प्रतिक आहेत असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पदमभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी केले.
‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्यावतीने आयोजित अक्षरगप्पांच्या ११० व्या कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीवेळी ते बोलत होते. समीर देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
गडहिंग्ललज येथील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण, कोल्हापूरमधील राजाराम महाविद्यालयातील अध्ययन, सारस्वत बोर्डिंगमधील वास्तव्य आणि गोखले महाविद्यालयातील अध्यापन अशा अनेक आठवणी यावेळी डॉ. मुजुमदार यांनी जागविल्या.
सामाजिक काम करताना अपमान गिळायला शिकण्याची गरज असून त्या काळातही मला असे अनेक अनुभव आले. परंतू जिद्द, स्वच्छ हेतू आणि कष्टाची प्रचंड तयारी यामुळे यश मिळत गेले. नियतीनेही साथ दिली आणि आज सिंबायोसिस हा भारतातील शिक्षण क्षेत्रातील एक दर्जेदार बॅंड बनला आहे. कोणत्याही राष्ट्राचा विकास होण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर अधिक भर देण्याची गरज असून या दोन्ही क्षेत्रात सिंबायोसिस आघाडीवर आहे.
रवींद्र जोशी यांनी स्वागत केले. यावेळी संजीवनी मुजुमदार, माजी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. एच. व्ही. देशपांडे, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, सारस्वत बोर्डिंगचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एका घटनेने बदलले आयुष्य
डॉ. मुजुमदार म्हणाले, फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी रेक्टर होतो. एका माॅरिशसच्या विद्यार्थ्यांला एक मुलगी बाहेरून सलग काही दिवस जेवण आणून देत होती. हा नेमका प्रकार काय आहे याची माहिती घेतल्यानंतर तो मुलगा काविळीने आजारी होता. त्याची बहिण त्याला बाहेरून जेवण आणून देत होती. मला खरा प्रकार समजला आणि मग मी पुण्यात शिकायला आलेल्या विदेशी मुलांच्या अडचणी समजून घेतल्या. तर त्यांचे पुणे आणि भारताबद्दल मत वाईट होत चालले होते. म्हणूनच या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी सिंबायोसिस उभी करण्याचा निर्णय घेतला. या एका साध्या घटनेतून सिंबायोसिसचा जन्म झाला.