उगीच म्हणत नाय, आम्ही कोल्हापुरी जगात भारी; हॉटेल चालकाने रक्षाविसर्जनासाठी एक रुपयात दिला उत्ताप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:34 IST2025-04-10T13:33:24+5:302025-04-10T13:34:18+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरात शेवटचा हारही मोफत उपलब्ध करून दिला जातो हे ऐकले होते, पण नैवेद्याचे पैसे घेत नाही हे ...

उगीच म्हणत नाय, आम्ही कोल्हापुरी जगात भारी; हॉटेल चालकाने रक्षाविसर्जनासाठी एक रुपयात दिला उत्ताप्पा
कोल्हापूर : कोल्हापुरात शेवटचा हारही मोफत उपलब्ध करून दिला जातो हे ऐकले होते, पण नैवेद्याचे पैसे घेत नाही हे मी आज अनुभवले. ‘सलाम त्या माणुसकीला खरंच जगात भारी आम्ही कोल्हापुरी.. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणारं आमचं कोल्हापूर’ अशी पोस्ट संदीप लवटे यांनी शेअर केली. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
कोल्हापूरकरांची माणुसकी, दिलदारपणा, जिवाला जीव लावण्याची पद्धत, मदतीसाठी एका पायावर तयार ही खासियत अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. पण या स्वभाव वैशिष्ट्याचा अनुभव एका नागरिकाला आला. त्यांनी तो समाज माध्यमावर पोस्ट केला असून, चांगलाच व्हायरल झाला आहे.
संदीप लवटे यांनी ‘हे कोल्हापूर आहे, इथे अजून माणुसकी जिवंत आहे’ या मथळ्याखाली ही पोस्ट केली आहे. लवटे यांच्या मावशीच्या पतीचे रविवारी (दि. ६ एप्रिल) निधन झाले. मंगळवारी रक्षाविसर्जन होते. काकांना उत्ताप्पा आवडत असल्याने नैवेद्यात ठेवण्यासाठी ते हॉटेलमधून आणायला सकाळी ७ वाजता कावळा नाका येथील घरातून बाहेर पडले. सगळी हॉटेल बंद असल्याने शोधत शोधत महाद्वार रोडवरील हॉटेल सन्मान येथे आले. हॉटेलचे शटर थोडेसे उघडे ठेवून तयारी सुरू होती. त्यातूनच त्यांनी वाकून विचारले, ‘दादा उत्ताप्पा मिळेल काय?’ बाहेर आवरत असणारा कर्मचारी म्हणाला, ‘अर्धा पाऊण तास लागेल.’
बोलता बोलता त्यांना सांगितले की, रक्षाविसर्जनच्या नैवेद्यासाठी पाहिजे. हे ऐकताच त्यांनी तातडीने उत्ताप्पा तयार करून दिलाच, पण पैसेही घेतले नाहीत. फुकट देत नाही म्हणून एक रुपया घेतला. पैशाच्या मागे पळणाऱ्या जगात फुकट कोणी काही देत नसताना या हॉटेलने वारलेल्या व्यक्तीच्या नैवेद्यासाठी पैसे न घेता त्यांच्या दु:खात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपली. कर्मचारी, आचारी व त्यांना ही पद्धत जपायला लावणाऱ्या हॉटेल सन्मानच्या मालकांचे कौतुकच.