हाॅटेल छोटं मन मात्र मोठं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:52+5:302021-04-24T04:22:52+5:30
कोल्हापूर : पंधरा दिवसांच्या संचारबंदीमुळे कोणाच्या पोटाचे हाल होऊ नयेत, या उद्देशाने हुपरी (ता. हातकणंगले) माळवाडी बसस्टॅन्डजवळील हाॅटेल व्यावसायिक ...
कोल्हापूर : पंधरा दिवसांच्या संचारबंदीमुळे कोणाच्या पोटाचे हाल होऊ नयेत, या उद्देशाने हुपरी (ता. हातकणंगले) माळवाडी बसस्टॅन्डजवळील हाॅटेल व्यावसायिक विद्याधर पाटील यांनी १६ एप्रिलपासून लाॅकडाऊन उठेपर्यंत गरजू, निराधार, फिरस्त्यांना रोज मोफत जेवण देण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. अशा कालावधीत गरजू आणि निराधार व्यक्तींचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. यापूर्वीच्या लाॅकडाऊन दरम्यानही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अशा गरजूंसाठी हुपरीमधील हाॅटेल व्यावसायिक विद्याधर पाटील यांनी आपल्या हाॅटेलमधील जेवण मोफत देण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम ते १ मेपर्यंत राबविणार आहेत. जर लाॅकडाऊन वाढले तर ते हा उपक्रम पुढेही सुरु ठेवणार आहेत. ही संकल्पना त्यांना शासनाच्या शिवभोजन थाळीवरून सुचली. या थाळीला गरजूंचा प्रतिसादही त्यांनी पाहिला आहे. त्यामुळे समाजातील गरजूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शासनाच्या या चांगल्या कामात आपलाही खारीचा वाटा उचलून हातभार लावावा, या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दिवसभरात त्यांच्याकडून ५०-६० जणांना मोफत जेवण दिले जात आहे.
हाताला दिले काम साधला परमार्थ
लाॅकडाऊन काळात हाॅटेलमध्ये काम करणारे कामगार एकदा गावाला गेले की पुन्हा चार-चार महिने माघारी फिरत नाहीत. त्यामुळे विद्याधर यांनी या कालावधीत कामगारांच्या हाताला काम दिले आणि गरजूंच्या पोटाला अन्नही दिले. त्यामुळे दोन्ही हेतू त्यांनी साध्य केले.
कोट
कोरोना संसर्गाच्या काळात अनेक फिरस्त्यांच्या पोटाचे हाल होऊ नयेत. त्यांच्या पोटाला चार घास अन्न मोफत मिळावे. यासोबतच माझ्या छोट्याशा अमृत हाॅटेलमध्ये काम करत असलेल्या कामगारांच्या हाताला काम मिळेल, या दुहेरी उद्देशाने मी हा उपक्रम सुरु केला आहे.
- विद्याधर पाटील, हाॅटेल व्यावसायिक, हुपरी (ता. हातकणंगले)
फोटो : २३०४२०२१-कोल-विद्याधर पाटील
फोटो : २३०४२०२१-कोल-हुपरी हाॅटेल
ओळी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील हाॅटेल व्यावसायिक विद्याधर पाटील यांनी गरजूंना आपल्या हाॅटेलमधून रोज मोफत जेवण देण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.