नववर्षाचे स्वागत जल्लोषात, हॉटेल्स रात्री बारापर्यंत सुरु राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 11:42 AM2021-12-31T11:42:24+5:302021-12-31T11:43:02+5:30
जिल्ह्यातील जमावबंदी आणि ओमायक्रॉनबाबतच्या निर्बंधामुळे नववर्षाच्या स्वागतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करत कोल्हापूरकरांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे नियोजन केले आहे.
कोल्हापूर : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात नियम आणि निर्बंधांचे पालन करत आज, शुक्रवारी सरत्या वर्षाला निरोप, तर नववर्षाचे स्वागत होणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल खवय्यांसाठी रात्री बारापर्यंत सुरु राहणार आहेत. त्यादृष्टीने हॉटेल व्यावसायिकांनी तयारी केली आहे.
जिल्ह्यातील जमावबंदी आणि ओमायक्रॉनबाबतच्या निर्बंधामुळे नववर्षाच्या स्वागतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करत कोल्हापूरकरांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे नियोजन केले आहे. आपल्या बजेट आणि सोयीस्कर ठरणाऱ्या हॉटेलमध्ये टेबलची नोंदणी अनेकांनी केली आहे. आपल्या अथवा मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांच्या घरी काहींनी मर्यादित सदस्यांच्या उपस्थितीमध्ये पार्टीची तयारी केली आहे.
हॉटेल व्यावसायिकांनी ५० टक्के क्षमतेने बैठक व्यवस्था, एक आड एक टेबलची रचना केली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार पार्सल सुविधा पुरविण्याची तयारी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. हॉटेलमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, रात्रीची जमावबंदी असल्याने अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी खुल्या मैदानातील पार्टीचे नियोजन रद्द केले आहे.
जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या नियमांचे पालन करून शुक्रवारी रात्री बारापर्यंत कोल्हापुरातील हॉटेल सुरू राहणार आहेत. त्यादृष्टीने आम्ही सर्व व्यावसायिकांनी तयारी केली आहे. निर्बंध आणि नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करणार आहोत.-आनंद माने, संचालक, कोल्हापूर हॉटेल मालक संघ