अंगणवाडी सेविकांचा तासभर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2017 12:43 AM2017-03-21T00:43:35+5:302017-03-21T00:43:35+5:30

रणरणत्या उन्हात मोर्चा : सरकारविरोधी घोषणाबाजी; १ एप्रिलपासून बेमुदत संपावर

Hours of Anganwadi Sevikas | अंगणवाडी सेविकांचा तासभर ठिय्या

अंगणवाडी सेविकांचा तासभर ठिय्या

Next

कोल्हापूर : मानधनवाढीचा निर्णय सरकारने न घेतल्याने १ एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा सोमवारी रणरणत्या उन्हात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून दिला. या ठिकाणी राज्य सरकार व महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलकांनी तासभर ठिय्या मारला.
दुपारी एकच्या सुमारास महावीर उद्यान येथून कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली. दोन हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. ‘मानधन वाढ झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही’, ‘या सरकारचे करायचे काय?’ अशा घोषणांचे फलक घेतलेल्या आंदोलकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. या ठिकाणी फाटकातून आत प्रवेश करीत थेट जि. प.च्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन निदर्शने करून ठिय्या मारला. या ठिकाणी राज्य सरकारसह मंत्री पंकजा मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. रणरणत्या उन्हात तब्बल तासभर ठिय्या मारण्यात आला.
दरम्यान, संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) शिल्पा पाटील उपस्थित होत्या.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागण्यांबाबत यापूर्वी अनेकवेळा आंदोलने झाली आहेत. शासनाने सेविका व मदतनीस यांना मानधनवाढ देण्याबाबत समिती स्थापन केली आहे, परंतु या समितीचे कामकाज संथगतीने सुरू आहे. याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील दहा हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस १ एप्रिलपासून संपावर जाणार आहेत. याबरोबरच केंद्र सरकारने सेविका व मदतनिसांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे व यातील फरकाची रक्कम तत्काळ मिळाली पाहिजे, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे थकीत मानधन या आठवड्यात देऊ, तसेच कर्मचाऱ्यांवर लाईन लिस्टिंगच्या कामाची सक्ती करू देणार नाही, असे आश्वासन डॉ. खेमनार यांनी दिले. आंदोलनात जयश्री पाटील, सरिता कंदले, शोभा भंडारे, विद्या कांबळे, नंदा भोरे, कमल जाधव, मंगल माळी, अपर्णा मिरजकर, सुमन शिरगावे, सुनीता खोत, पद्मावती चौगुले, सुलोचना कोळी, आदी सहभागी झाल्या होत्या.


अंगणवाडी सेविकांच्या मागण्या
राज्य शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधनवाढ देण्याबाबत स्थापन केलेल्या समितीचे काम संथगतीने
केंद्र सरकारने मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे व फरकाची रक्कम मिळाली पाहिजे
अंगणवाडी सेविका व मदतनिसांना किमान वेतन म्हणून महिन्याला १८,००० रुपये मिळावेत, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन हे सेविकांपेक्षा ५० टक्के कमी आहे ते ७५ टक्के इतके करण्यात यावे.

Web Title: Hours of Anganwadi Sevikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.