घरफोड्या, चोरट्यांचा कोल्हापूर शहरात धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 02:27 PM2018-12-26T14:27:32+5:302018-12-26T14:29:06+5:30
वर्षअखेरीला शहरासह उपनगरांत घरफोडी, लूटमारीच्या घटनांनी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. चोरट्यांच्या धुमाकुळामुळे नागरिकांसह घरांची सुरक्षितता धोक्याची बनली आहे.
कोल्हापूर : वर्षअखेरीला शहरासह उपनगरांत घरफोडी, लूटमारीच्या घटनांनी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. चोरट्यांच्या धुमाकुळामुळे नागरिकांसह घरांची सुरक्षितता धोक्याची बनली आहे.
‘दिसले बंद घर की फोडले,’ अशी भयावह अवस्था याठिकाणी पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घालून पोलिसांना थेट चॅलेंज दिले आहे. या वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांची झोपच उडाली आहे.
दिवसें-दिवस घरफोड्या, चोरी, लूटमार आदी गुन्ह्यांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे फारच चिंताजनक ठरत आहे. नाताळच्या सुटीला लोक परगावी गेले आहेत तर काहीजण कुटुंबासह फिरायला बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत बंद घर हेरून ते रात्रीच सोडा दिवसाही फोडण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र गस्तीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश दिले आहेत; परंतु चोरटे पोलिसांच्या गस्तीची वेळ पाहूनच चोरीचा प्लॅन करत आहेत. पोलीस दप्तरी असलेल्या शेकडो चोºयांचा अद्यापही उलगडा पोलिसांना करता आलेला नाही.
कारंडे मळा येथे चोरट्यांनी महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून लाखो रुपयांचा ऐवज भरदिवसा लंपास केला होता. त्यांचा थांगपत्ता शाहूपुरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना अद्यापही लागलेला नाही. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी होणाऱ्यां लक्ष्मीपूजनाचे पैसे आणि दागिन्यांवरही चोरट्यांनी हात साफ करून घेतले आहेत. गेल्या महिन्याभरातील सर्व घरफोड्या दरवाजा व खिडकीचे लोखंडी गज वाकवून झाल्या आहेत.
दिवसेंदिवस घरफोड्या वाढत असतानाही पोलीस मात्र सुस्त बसले आहेत. रात्र गस्त नाही की घरफोड्यांची उकल करण्यासाठी कोणतेही प्रयत्न नाहीत. घरफोडी झाल्याचे समजताच परिसरात जाऊन पाहणी करायची, चोरीस गेलेला मुद्देमाल कागदावर ओढायचा, एवढे झाले की पुढे तपास ठप्प.
गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात येऊनही त्याकडे ते दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे; त्यामुळे घरफोड्या करूनही चोरटे मोकाट फिरत आहेत. गेल्या महिन्याभरात झालेल्या एकाही घरफोडीचा मागमूस पोलिसांना लागलेला नाही. चौकशी केली असता ‘तपास सुरू आहे,’ इतकेच सांगितले जाते. पोलिसांच्या निष्क्रीय कामगिरीमुळे नागरिकांची झोपच उडाली आहे.