घरफाळ्यातील वाद, गोकुळमधील संघर्ष वाढवणार, आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा : मुश्रीफ यांनाही केले टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:23 AM2021-03-14T04:23:30+5:302021-03-14T04:23:30+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (गोकुळ) तडजोडीच्या हालचाली सुरू असताना महाडिक समर्थक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतेज ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (गोकुळ) तडजोडीच्या हालचाली सुरू असताना महाडिक समर्थक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घरफाळा व अन्य प्रकरणांवरून गैरव्यवहाराचे आरोप केल्याने गोकूळमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
हॉटेलच्या घरफाळ्याचा विषय यापूर्वीही दोन निवडणुकीवेळी उपस्थित झाला आहे. त्यावेळीही त्याबद्दल उलटसुलट चर्चा झाली. ऐन विधानसभा निवडणुकीत तोंडावर मतदान असताना त्याबाबत आरोप झाले; परंतु तरीही निवडणुकीचा निकाल अपेक्षित असाच लागला. आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. ती वेळेत होते की लांबणीवर पडते हे निश्चित नाही, असे असताना आरोपांचा बार आताच उडवून द्यायची गरज नव्हती. ऐन निवडणुकीच्या काळात पुराव्यानिशी आरोप झाले असते तर त्याचा जनमाणसावर काही प्रमाणात परिणाम झाला असता. कारण निवडणूकही महापालिकेची आणि आरोपही त्याच संस्थेच्या कारभाराबद्दल झाल्याने त्यातील गांभीर्य वाढले असते. आताच हे आरोप होण्यामागे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या चिरंजीवाच्या पुण्यात झालेल्या लग्न समारंभात गर्दी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे निमित्त घडले असल्याचे दिसते. हा गुन्हा गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांच्यामुळेच दाखल झाला, असे महाडिक गटाला वाटते. त्यामुळे ते लग्न करून कोल्हापुरात आल्यावर तातडीने महाडिक यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन घरफाळ्याचे आरोप केले. यापूर्वीचे आरोप कदम बंधूंनी केले होते; परंतु यावेळेला मैदानात थेट माजी खासदार महाडिकच उतरल्याने त्याचे गांभीर्य वाढले.
मुश्रीफ यांची खपली...
पालकमंत्र्यांसोबत आता ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यावरही काही आरोप झाले आहेत. एक गंभीर आरोप तर पत्रकार परिषदेत केला व नंतर तो मागे घेण्यात आला; परंतु त्याची जाहीर चर्चा व्हायची ती झालीच. महापालिकेच्या आधी गोकुळ दूध संघाची लढाई होणार आहे. त्यात मुश्रीफ यांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. अशा स्थितीत त्यांची खपली काढण्याची गरज नव्हती. अशा आरोप-प्रत्यारोपातून निष्पण्ण काही होत नाही. कारण त्याचा नंतर पाठपुरावा होत नाही. कदम बंधू यांनीच गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी केलेले आरोप नंतर ते विसरले आता पुन्हा निवडणूक आल्यावरच त्यांना ते आठवले. त्यामुळे त्यातून काही हाती लागण्यापेक्षा राजकीय संघर्ष वाढणार एवढे मात्र नक्की.