घरफाळा वसुलीचे उद्दिष्ट अयशस्वी

By admin | Published: March 31, 2016 12:30 AM2016-03-31T00:30:50+5:302016-03-31T00:32:22+5:30

नागरिकांनी फिरवली पाठ : मनपा आयुक्तांचे थकबाकी भरण्याचे आवाहन; एलबीटीच्या वसुलीने मात्र प्रशासनाला दिलासा

House tax recovery goal failed | घरफाळा वसुलीचे उद्दिष्ट अयशस्वी

घरफाळा वसुलीचे उद्दिष्ट अयशस्वी

Next

कोल्हापूर : घरफाळा विभागाकडील बिल वाटपातील सावळागोंधळ, चुकीची आकारणी, दंड व्याजाची पुन्हा झालेली आकारणी, आदी कारणांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी घरफाळा भरण्याची इच्छा असूनही पाठ फिरविल्यामुळे यंदा महानगरपालिकेचे शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.
विविध करांची कशीबशी ८५ टक्क्यांपर्यंत वसुली करताना प्रशासनाच्या तोंडाला फेस आला आहे. दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी नागरिकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले.
महानगरपालिका प्रशासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात विविध करांच्या माध्यमातून ३०९ कोटींच्या जमेचे उद्दिष्ट ठरविले होते; परंतु आॅगस्ट २०१५ पासून एलबीटीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना सूट दिल्यामुळे जानेवारी महिन्यात उद्दिष्ट १० कोटींनी कमी करून ते २९९ कोटी निश्चित केले, तरीही हे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले. आज, गुरुवारी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत जेमतेम ८५ टक्क्यांपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ गतवर्षात ४० ते ४५ कोटींचा तोटा सोसावा लागला आहे. विशेष म्हणजे एलबीटीमधून बहुसंख्य व्यापाऱ्यांना सूट मिळाली असली तरी मागील थकबाकी वसूल केल्याने प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला.
आज, गुरुवारी संपणाऱ्या आर्थिक वर्षात एलबीटीपासून १०५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. प्रत्यक्षात हा कर थकबाकीसह १०३ कोटींपर्यंत वसूल झाला. पाणीपट्टी वसुली ४९ कोटी अपेक्षित असता ती ४४ कोटींपर्यंतच वसूल झाली आहे. मुख्य उत्पन्नाचे स्रोत असलेल्या घरफाळा विभागाला ४१ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, आज ३१ कोटीच वसूल झाले. नगररचना विभागाने ५७ कोटींपैकी ५१ कोटींचा कर वसूल केला. एलबीटीवगळता सर्व विभागांची वसुली असमाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले.


वादाची रक्कम सोडून घरफाळा भरा
आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी महापालिकेच्या वसुलीचा आढावा घेतला, त्यावेळी मोठी थकबाकी राहत असल्याचे निदर्शनास आले. या वर्षाची थकबाकी तसेच चालू देयक भरून घेण्यासाठी दि. २ एप्रिलपर्यंत सर्व कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. पुढील वर्षाच्या दंड व्याजात सवलत मिळवायची असेल तर सर्व कर नागरिकांनी भरावा, असे आवाहन आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना केले.
घरफाळा विभागात सावळागोंधळ झाल्याचे आयुक्तांनी मान्य केले. मात्र, ज्या रकमेबाबत वाद आहे ती सोडून उर्वरित रक्कम देय वेळेत भरावी, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. ज्यांच्या घरफाळ्याची बिले चुकीची आली आहेत, ती सुनावणी घेऊन दुरुस्त केली जातील, परंतु बिले कशी चुकीची आहेत हे पटवून देणारे पुरावे ग्राहकांनी तक्रार अर्जासोबत द्यावेत, असे आयुक्तांनी सांगितले.
नवीन वर्षात बिले पोस्टाने देणार
घरफाळा विभागाची बिले वेळेत मिळाली नाहीत अशा तक्रारी आहेत, त्याची दखल घेत नवीन वर्षापासून जून ते जुलै महिन्यांत सर्वांना पोस्टाने ती पाठविण्यात येतील, अशी माहिती शिवशंकर यांनी दिली.

Web Title: House tax recovery goal failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.