घरफाळाप्रश्नी प्रशासनावर हल्लाबोल

By admin | Published: April 17, 2016 12:55 AM2016-04-17T00:55:23+5:302016-04-17T00:55:23+5:30

महानगरपालिका सभा : उप शहर अभियंता माने यांना काढले बाहेर, सदस्य आक्रमक, ‘आयुक्त चले जाव’च्या घोषणांनी सभागृह दणाणले

HousePolit attack on the administration | घरफाळाप्रश्नी प्रशासनावर हल्लाबोल

घरफाळाप्रश्नी प्रशासनावर हल्लाबोल

Next

कोल्हापूर : घरफाळा वाढीचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तो विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे का पाठविला आणि खासगी आरक्षित जागेतील सन २००० पूर्वीच्या झोपड्या कोणाच्या सांगण्यावरून हटविल्या, या दोन प्रश्नांवर शनिवारी महानगरपालिकेच्या सभेत सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवित हल्लाबोल केला.
प्रशासनाच्या कृतीचा निषेध करताना ‘आयुक्त चले जाव’च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. एका अधिकाऱ्याच्या हातातील फाईल सभागृहात भिरकावली, तर एका सदस्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या दिशेने फाईल भिरकावली. सदस्यांची आक्रमक भूमिका पाहून अधिकाऱ्यांना मात्र अक्षरश: घाम फुटला.
महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महानगरपालिकेच्या दोन सभा झाल्या. पहिल्या सभेत सदस्यांनी अक्षरश: ठरवून प्रशासनाला लक्ष्य केले. त्याच्या केंद्रस्थानी आयुक्त पी. शिवशंकर होते. फेबु्रवारी महिन्यात झालेल्या सभेत घरफाळा वाढीचा ठराव नामंजूर केला होता, तरीही महासभेचा नामंजूर केलेला ठराव विखंडित करावा म्हणून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्यामुळे संपूर्ण सभागृहाने आयुक्तांना टीकेचे लक्ष्य केले. आयुक्तांनी महापौरांसह संपूर्ण सभागृहाचा अवमान केला असून, त्यांच्या बदलीचा ठराव याच सभेत करावा, अशी मागणी संतप्त सदस्यांमधून पुढे आली. विशेष म्हणजे या सभेस आयुक्त उपस्थित नव्हते.
घरफाळा वाढीचा ठराव विखंडित करण्याच्या आयुक्तांनी केलेल्या मागणीचा मुद्दा विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आणि सभागृहात चौफेर टीका करण्यात आली. पहिला शाब्दिक हल्ला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यावरच झाला. घरफाळा वाढ रद्द करण्याचा ठराव झाला तर तो राज्य सरकारकडे विखंडित करण्यासाठी पाठविणार नाही, असे आश्वासन मागील सभेत आयुक्तगैरहजर असताना तुम्ही सभागृहाला आश्वासन दिले होते. तरीही तो आयुक्तांनी राज्य सरकारकडे का पाठविण्यात आला, असा जाब संतप्त सदस्यांनी अतिरिक्त आयुक्तांनी विचारण्यास सुरुवात केली. विजय सूर्यवंशी, तौफिक मुल्लाणी, भूपाल शेटे, अजित ठाणेकर, प्रवीण लिमकर, राहुल चव्हाण, कमलाकर भोसले, तर प्रशासनावर तुटून पडले. सभागृहाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यास आयुक्तांच्या खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही, त्यांनी कामकाजात भाग घेऊ नये, अशा शब्दांत तोंडसुख घेतले. सभाध्यक्ष महापौर रामाणे यांनीही तुम्ही सांगितले एक आणि केले उलटे, आधी त्याचा खुलासा करा, असा आदेश दिला. (प्रतिनिधी)

Web Title: HousePolit attack on the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.