निधीअभावी यशवंत घरकूल योजनेतील घरे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:24+5:302021-06-25T04:17:24+5:30

मोहन सातपुते उचगाव : धनगर व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण घरकूल योजनेतून करवीर पंचायत समितीकडून ८० लाभार्थ्यांसाठी ...

Houses under Yashwant Gharkool scheme stalled due to lack of funds | निधीअभावी यशवंत घरकूल योजनेतील घरे रखडली

निधीअभावी यशवंत घरकूल योजनेतील घरे रखडली

Next

मोहन सातपुते

उचगाव : धनगर व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण घरकूल योजनेतून करवीर पंचायत समितीकडून ८० लाभार्थ्यांसाठी घरे मंजूर केली खरी, पण निधीच नसल्यामुळे या सर्व लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न अधांतरी राहिले आहे. विशेष म्हणजे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर काहींनी निधी मिळेल या आशेवर कर्ज काढून घराचे काम सुरू केले आहे. मात्र, अद्यापही निधी न मिळाल्याने हे लाभार्थी हवालदिल झाले आहेत. यशवंतराव चव्हाण घरकूल योजनेसाठी करवीर पंचायत समितीकडे ११० हून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ८० अर्ज मंजूर झाले असून उर्वरित अर्ज काही किरकोळ त्रुटीअभावी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रचंड गाजावाजा करून जाहीर केलेली यशवंत घरकूल योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना आणखीन किती दिवस वाट पाहावी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या योजनेतून घरे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी पैसे न मिळाल्याने आपली घरबांधणी पुढे ढकलली आहे तर काहींनी व्याजदराने कर्ज काढून घर बांधणी सुरू केली आहे. या योजनेसाठी आवश्यक निधी कोरोनामुळे गोठवण्यात आल्याचे सांगितले जात असून या योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी धनगर समाजाच्यावतीने करण्यात येत आहे. या योजनेसाठी एका लाभार्थ्याला दीड लाखापर्यंत निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्यास ५ हजार चौरस फूट जागा निवास व स्वयंरोजगारासाठी दिली जाते. यासाठी भटक्या जाती, विमुक्त जमाती या घटकातील व्यक्तींना घरकुल योजनेत लाभ घेता येतो. त्यासाठी लाभ घेण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. दरम्यान निधी नसताना या योजनेसाठी प्रस्तावाची घाई का केली, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

येत्या जुलै महिन्यापर्यंत लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही तर अनेक संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

चौकट : अजूनही ग्रामीण व शहरी भागातील धनगर व भटक्या जमातीतील लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. त्यांनाही या योजनेचा लाभ शासनाने त्वरित मिळवून द्यावा.

डॉ. संदीप हजारे, कोल्हापूर जिल्हा यशवंत सेना जिल्हा संपर्क प्रमुख

कोट: लोकप्रिय योजनांची फक्त घोषणा करून अर्ज मागवणे व त्यासाठी निधीची तरतूदच न करणे म्हणजे वंचित आणि उपेक्षित समाजाची घोर फसवणूक करण्याचा प्रकार आहे. यासाठी तातडीने निधी उपलब्ध करावा अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात येतील.

बबन रानगे, सरसेनापती, मल्हार सेना.

कोट : या योजनेसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू असून काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर निधीचे वितरण करण्यात येत आहे. ज्या गरजू व्यक्तींना योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांना आपले अर्ज कार्यालयात सादर करावेत.

बी. एस. जगताप, विस्तार अधिकारी, सांख्यिकी व घरकुल विभाग पंचायत समिती करवीर

कोअ : यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी अनेक प्रस्ताव दाखल झाले असून यातील बहुतांश प्रस्ताव मंजूर झाले आहेत. निधी नसल्याने अडचणी निर्माण झाली आहे. योजनेच्या निधीसाठी शिष्टमंडळाद्वारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून मागणी केली आहे. मुश्रीफ यांनी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले आहे.

कृष्णात पुजारी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भटक्या विमुक्त जाती.

फोटो : यशवंतराव चव्हाण घरकूल योजना

Web Title: Houses under Yashwant Gharkool scheme stalled due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.