पत्रकारांचा गृहनिर्माण प्रश्न मार्गी लावणार : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:45 AM2020-01-07T11:45:06+5:302020-01-07T11:46:48+5:30
पत्रकारांचा गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे दिली. शाहू स्मारक भवनात कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित ‘उत्कृष्ट पत्रकार व कॅमेरामन पुरस्कार’ वितरण समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कोल्हापूर : पत्रकारांचा गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे दिली. शाहू स्मारक भवनात कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित ‘उत्कृष्ट पत्रकार व कॅमेरामन पुरस्कार’ वितरण समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर उपस्थित होत्या. ‘लोकमत’चे बातमीदार संतोष मिठारी यांच्यासह छायाचित्रकार इम्रान गवंडी, कॅमेरामन मिथुन राज्याध्यक्ष, विश्र्वास पानारी यांना गौरविण्यात आले.
सुनंदन लेले यांनी महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर यांच्यासह खेळाडूंची उदाहरणे देत ‘क्रीडा पत्रकारिता आणि समाज’ या विषयावर विवेचन केले. ते म्हणाले, ‘क्रीडा असो किंवा पत्रकारिता सगळ्याच क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धेत तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर संधी शोधायला, त्याचं सोनं करायला शिका. परिस्थिती कोणतीही असो, पाय जमिनीवर ठेवा. गुणवत्ता असली तरी, मेहनतीचे मोल विसरू नका. समाजमाध्यमे, चॅनेल्सनंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी छापून येते; त्यामुळे बातमीत वेगळेपण येईल यासाठी प्रयत्न करा.’
महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी पत्रकारांनी धावपळीच्या आयुष्यातही आरोग्य आणि कुटुंबीयांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला. प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष उद्धव गोडसे यांनी प्रास्ताविक केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. मंजित भोसले यांनी आभार मानले.
पत्रकारांकडून अधिकाधिक संशोधन व्हावे, यासाठी ‘नॅक’चे माजी सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या वतीने एक लाखाचा निधी कोल्हापूर प्रेस क्लबसाठी दिला.हा धनादेश गुरुबाळ माळी यांनी प्रेस क्लबकडे सुपूर्द केला.