‘गणिताचे अडले घोडे, कसे म्हणावे पाढे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:16 AM2019-06-28T11:16:25+5:302019-06-28T11:18:36+5:30
गणिताचे अडले घोडे कसे म्हणावे पाढे, बालभारतीची बाल बुद्धी, संख्यावाचन पद्धती पूर्ववत झालीच पाहिजे... अशा घोषणा देत गुरुवारी दुसरीच्या नव्या संख्यावाचन पद्धतीबद्दल कोल्हापूर जनशक्तीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या पद्धतीमुळे मराठी भाषेचेही अध:पतन, तसेच व्यवहारात मोठा गोंधळ निर्माण होणार आहे, तरी संख्यावाचनातील पद्धत पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
कोल्हापूर : गणिताचे अडले घोडे कसे म्हणावे पाढे, बालभारतीची बाल बुद्धी, संख्यावाचन पद्धती पूर्ववत झालीच पाहिजे... अशा घोषणा देत गुरुवारी दुसरीच्या नव्या संख्यावाचन पद्धतीबद्दल कोल्हापूर जनशक्तीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या पद्धतीमुळे मराठी भाषेचेही अध:पतन, तसेच व्यवहारात मोठा गोंधळ निर्माण होणार आहे, तरी संख्यावाचनातील पद्धत पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण संस्कृतसारखी भाषा देशाच्या अभ्यासक्रमात आणण्याचा निर्णय घेतो आणि दुसरीकडे मराठीतील जोडाक्षरे वाचायला लागू नयेत म्हणून संख्यावाचन पद्धतच बदलतो, हा प्रचंड विरोधाभास आहे. कन्नड, तमिळ, तेलगू, मल्ल्याळम या धर्तीवर बदल करत असताना त्या भाषांत अनेक संख्यांना उचित शब्दच नसल्याने त्यांची वाचनपद्धती अपूर्णावस्थेत आहे. याउलट मराठीत प्रत्येक संख्येला यथोचित शब्द वापरले आहेत.
मात्र बालभारतीने केलेल्या नव्या बदलांमुळे मुलांच्या शिक्षणात सावळा गोंधळच माजण्याची शक्यता जास्त आहे. सदरचा निर्णय घेताना विचारवंत, साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञांना विश्वासात घेणे गरजेचे होते. तसेच या बदलाबाबतची पूर्वतयारी व शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे असताना, अशी कोणतीही कृती झालेली नाही.
एकीकडे मराठी शाळांकडे विद्यार्थी, पालकांचा ओढा वाढविण्यासाठी शासकीय, सामाजिक व संस्थात्मक पातळीवर प्रयत्न सुरू असताना, अशा पद्धतीचे बदल संभ्रमावस्था वाढविणारे आहेत, तरी संख्यावाचनाची पद्धत पूर्ववत करण्यात यावी. शिष्टमंडळात समीर नदाफ, अरुण अथणे, विश्वास नाईक, तय्यब मोमीन, दिलीप पाटील, बाबासाहेब मुल्ला, राजेश माने, लहुजी शिंदे, बाबा वाघापूरकर, रियाज कवठेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.