भाऊ भाजपमध्ये असताना कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडे मते मागणार कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:05 AM2019-03-06T11:05:24+5:302019-03-06T11:10:03+5:30
भाऊ भाजपमध्ये असताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे कशी मते मागू शकता? असा टोला आमदार सतेज पाटील यांनी नाव न घेता खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. तसेच गेल्या पाच वर्षांत भाजपला मदत करून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसला संपविण्याचेच काम त्यांनी केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
कोल्हापूर : भाऊ भाजपमध्ये असताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे कशी मते मागू शकता? असा टोला आमदार सतेज पाटील यांनी नाव न घेता खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. तसेच गेल्या पाच वर्षांत भाजपला मदत करून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसला संपविण्याचेच काम त्यांनी केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाटील पत्रकारांशी बोलत होते. जो-तो आपल्या पक्षाचा प्रचार करत आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीबाबत काय निर्णय होतोय याची आपल्याला कल्पना नाही. तसेच आघाडीकडून कोण उमेदवार हेही निश्चित झालेले नाही.
राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणविणाऱ्यांनी अजून राष्ट्रवादीचे घड्याळ व कॉँग्रेसचे चिन्ह लावलेले नाही; त्यामुळे सर्व संभ्रमावस्थेत आहेत. जोपर्यंत उमेदवारीची अधिकृतरीत्या घोषणा होत नाही, तोपर्यंत अधिक बोलणे उचित होणार नाही, असे आ. पाटील यांनी सांगितले.
भाऊ भाजपमध्ये असताना निवडणुकीत राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार म्हणून कॉँग्रेस व राष्ट्रवादीकडे कशी मते मागू शकतात, असा टोला आ. पाटील यांनी खा. महाडिक यांचे नाव न घेता लगावला. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत भाजपला मदत करून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस हे पक्ष कसे संपतील अशीच भूमिका महाडिक यांनी घेतली आहे.
हे सर्व कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावरही घातल्या असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. उमेदवारीबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नसल्याने यावर आताच बोलणे उचित होणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.