महाविकास आघाडीत भाजप कसे?; खासदार संजय मंडलिक यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 03:39 PM2021-12-22T15:39:09+5:302021-12-22T15:39:50+5:30
राज्यात भाजपविरोधात महाविकास आघाडी कार्यरत असताना जिल्हा बँकेमध्ये दुर्दैवाने भाजपला सोबत घेतले. त्यामुळे शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली.
काेल्हापूर : राज्यात भाजपविरोधात महाविकास आघाडी कार्यरत असताना जिल्हा बँकेमध्ये दुर्दैवाने भाजपला सोबत घेतले. त्यामुळे शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने यांनी या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेबाबत वरिष्ठांशी बोलू, असे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सांगितले.
माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, सामान्य माणूस सहकार चळवळीला जोडला आहे. त्यामुळे ती सक्षम ठेवण्यासाठी निवडणुकीची तयारी केली होती. शिवसेनासह इतर पक्षांची ताकद मिळाल्याने निश्चित यश मिळेल.
अरुण दुधवडकर म्हणाले, भाजपला सोबत घेणार असाल तर ते चालणार नाही. राजेंद्र पाटील हे कालपर्यंत आमच्यासोबत होते, आज काय झाले हे माहिती नाही. गेली दोन दिवस बँकेच्या निवडणुकीनिमित्त जे दिसले ते वरिष्ठांच्या कानावर घालणार आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत सोयीच्या राजकारणात एकमेकांचा वापर केला जात आहे.
‘गोकुळ’मध्ये वेगळा विचार आणि बँकेच्या निवडणुकीत शब्द पाळायचा नाही, हे योग्य नाही. या वेळी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबीटकर, सत्यजित पाटील-सरुडकर, उल्हास पाटील, संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.
शेट्टीं परिवर्तन आघाडीसोबत
राजू शेट्टी हे राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीसोबत असल्याचे त्यांनी स्वत: फोनवरून सांगितले आहे. शिरोळ तालुक्यातील उमेदवारीवरुन काही अडचणी असल्याने ते काही भूमिका घेऊ शकत नसल्याचे संपतराव पवार यांनी सांगितले.
भाजप, मित्रपक्षाला दोन जागा मिळाल्या
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँक बिनविरोध करताना दोन जागा घेण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रक्रियामधून प्रकाश आवाडे व इतर मागासवर्गीय गटातून विजयसिंंह माने हे आहेत, त्यामुळे भाजप, मित्रपक्षाला दोन जागा मिळाल्याचे विनय काेरे यांनी सांगितले.