'या भीषण संकटसमयी निवडणुकांचा विचारच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 02:03 PM2019-08-11T14:03:49+5:302019-08-11T14:09:19+5:30

राज ठाकरेंच्या मागणीवरील प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी राज ठाकरेंना चांगलाच टोला लगावला.

'How can anyone think of elections in times of crisis of kolhapur flood'? uddhav thackarey critics on raj thackarey | 'या भीषण संकटसमयी निवडणुकांचा विचारच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो'

'या भीषण संकटसमयी निवडणुकांचा विचारच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो'

Next
ठळक मुद्देराज ठाकरेंच्या मागणीवरील प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी राज ठाकरेंना चांगलाच टोला लगावला. मुसळधार पावसामुळे राज्यातील 10 जिल्हे आणि 64 तालुक्यात पूरस्थिती असून तिथे शिवसेना मदतकार्यासाठी पोहोचत आहे.

मुंबई - कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांसाठी आणि जनावरांसाठी डॉक्टरांची टीम पाठविण्यात येत आहे. तसेच, औषधांचा साठाही उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या नैसर्गित आपत्तीमध्ये राजकारण न आणता, खंबीर मनाने सर्वांनीची या पूरस्थितीचा सामना केला पाहिजे. आपण आपल्या माता-भगिनींच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

राज ठाकरेंच्या मागणीवरील प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी राज ठाकरेंना चांगलाच टोला लगावला. हे संकट एवढं भीषण आहे की, निवडणुकांचा विषयच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो हेच मला कळत नाही, अशा शब्दात उत्तर दिले. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच, आयोगाला याबाबत पत्रही लिहिणार असल्याचं राज यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, नाव न घेता उद्धव यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. 

राष्ट्रीय आपत्तीच्या शब्दात अडकण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सध्या तिथं तात्काळ मदत मिळाली पाहिजे, हेच मला वाटतंय. तेथील लोकांच्या मदतीसाठी काय गरजेचं आहे, हे ओळखून आपण काम केलं पाहिजे, बाकी मला कशात अडकायचं नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. आलमट्टी धरणातील पाण्याबद्दल बोलताना, सत्य असेल ते उघड होईल, कर्नाटक सरकार काही पाप करत असेल तर तेही उघड होईल, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, तुम्ही पाहणीसाठी का गेला नाहीत? या प्रश्नावरही उद्धव यांनी भाष्य केलं. तिथ जाऊन कोरडी सहानुभूती दाखविण्याच काम मी करणार नाही. इथ राहून जे शक्य ते आणि शिवेसना काय करायचंय ते मदतकार्य करत आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 

मुसळधार पावसामुळे राज्यातील 10 जिल्हे आणि 64 तालुक्यात पूरस्थिती असून तिथे शिवसेना मदतकार्यासाठी पोहोचत आहे. शिवसेनेला राज्यभरातून मदत येत आहे. त्यामध्ये, कपडे, अन्नधान्य, पिण्याचं पाणी, जीवनावश्यक वस्तू आणि किराणा पॅकींग यांचा समावेश आहे. या सर्व वस्तू कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांसाठी पोहोचविण्यात येणार आहेत. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि सर्वच पदाधिकारी याकामी उतरले आहेत, असे शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.  
 

Web Title: 'How can anyone think of elections in times of crisis of kolhapur flood'? uddhav thackarey critics on raj thackarey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.