राष्ट्रवादीची घसरण जयंतराव रोखणार कशी?

By admin | Published: January 28, 2017 11:31 PM2017-01-28T23:31:42+5:302017-01-28T23:31:42+5:30

साठ टक्के नेते भाजपमध्ये : जिल्हा परिषदेचा गड राखण्याचे मोठे आव्हान, निम्म्या जिल्ह्यात उमेदवारांच्या शोधात दमछाक

How can prevent Jayantra from falling NCP? | राष्ट्रवादीची घसरण जयंतराव रोखणार कशी?

राष्ट्रवादीची घसरण जयंतराव रोखणार कशी?

Next

अशोक डोंबाळे-- सांगली --जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे़ परंतु, लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी भाजपचे कमळ आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतल्यामुळे, राष्ट्रवादीत पोकळी निर्माण झाली आहे़ यावर मात करून यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासमोर आहे़
या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील सध्याची ३३ सदस्यांची संख्या टिकविणे हे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, आमदार सुमनताई पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, मानसिंगराव नाईक, ‘क्रांती’चे अध्यक्ष अरूण लाड या नेत्यांसमोर मोठे आव्हान आहे़ २००२ मध्ये जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडे ३७ सदस्यांसह स्पष्ट बहुमत आणि वाळवा, शिराळा, तासगाव, आटपाडी, खानापूर, पलूस या पंचायत समित्यांची सत्ता होती़ पुढे २००७ च्या निवडणुकीत २९ सदस्य संख्या झाली, तर काँग्रेसकडे तेवढीच ३० सदस्य संख्या होती़ आटपाडी गटातील रामभाऊ पाटील हे राष्ट्रवादीचे नेते अपक्ष सदस्य निवडून आले होते़ त्यामुळे दोन्ही काँग्रेसकडे जिल्हा परिषदेत समान सदस्य संख्या राहिली़ क्रांती आघाडी आणि जनसुराज्य यांचा प्रत्येकी एक सदस्य होता़ काँग्रेसला अंधारात ठेवत राष्ट्रवादीने क्रांती आणि जनसुराज्यच्या सदस्यांच्या सहकार्याने चार विषय समित्यांची सभापतीपदे पटकावली होती़
२०१२ च्या निवडणुकीपूर्वी जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गटनिहाय आढावा बैठका घेतला आणि ते मतदारांपर्यंत पोहोचलेही. त्यावेळी राष्ट्रवादीकडे मोठी फौज होती़ त्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून रोखत ३३ सदस्यांपर्यंत राष्ट्रवादीने मजल मारत जिल्हा परिषदेचा गड शाबूत ठेवला होता़
खानापूर तालुक्यातील सर्व चारही जागा राष्ट्रवादीकडे होत्या़ यंदा येथील एक तरी जागा राष्ट्रवादी ताब्यात ठेवेल की नाही, असे चित्र आहे. आटपाडी तालुक्यातीलही सर्व जागा राष्ट्रवादीकडे होत्या़ यावेळी येथील तानाजी पाटील गट शिवसेनेत दाखल झाला आहे. भाजप, काँग्रेसचीही शक्ती वाढली आहे़ त्यामुळे राष्ट्रवादी किती जागा टिकविणार, हे लवकरच दिसणार आहे़
जत तालुक्यात नऊपैकी राष्ट्रवादीकडे पाच, काँग्रेसकडे तीन आणि जनसुराज्यकडे एक जागा होती़ आ. विलासराव जगताप भाजपमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे़ राष्ट्रवादीला दोन जागांवर विजयी मिळवणे, हेही मुश्किलीचे ठरणार आहे़
तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीकडे ११ सदस्य होते़ यावेळी यातील किती जागा राष्ट्रवादीकडे राहणार, याचे गणित प्रत्येकजण करीत आहे़ संजयकाका पाटील भाजपमध्ये आहेत़ आऱ आऱ पाटील यांचे निधन झाले आहे. अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली आहे़ पण, ते राष्ट्रवादीशी बांधील नसल्याचेही सांगत आहेत़ यामुळे पक्षाच्या चिन्हावर कितीजण निवडून येणार, यावर आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित मांडले जाणार आहे
मिरज तालुक्यातील माजी आमदार दिनकर पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे येथे काही प्रमाणात राष्ट्रवादीला फटका बसेल़ मिरज तालुक्यातील पश्चिम भागातील कवठेपिरान, कसबे डिग्रज, समडोळी येथील जागांवर जयंत पाटील यांचे लक्ष आहे़ तेथे त्यांनी पक्षाची बांधणी केल्यामुळे राष्ट्रवादी पूर्वीची संख्या जैसे थे ठेवण्याची शक्यता आहे़
पलूस आणि कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादीची सर्वांत मोठी हानी झाली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला पडलेल्या मतदानावरून हे दिसत आहे़ अरूण लाड यांच्यामुळे कुंडल गटात काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर काट्याची लढत होईल. पण, उर्वरित ठिकाणी राष्ट्रवादीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे़ कडेगावमध्ये पक्षाला उमेदवार शोधावे लागणार आहेत.
वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय विकास आघाडी झाली आहे़ यामुळे पाटील गटाची राजकीय कोंडी झाली आहे़ तरीही ११ पैकी निम्या जागा पक्षाला मिळण्यास येथे काहीही अडचण नाही़ क्रांती आघाडीही वाळवा गटात यावेळी काट्याची टक्कर देणार असल्यामुळे, राष्ट्रवादीसमोर कडवे आव्हान उभे आहे़ शिराळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे़ यामुळे दोन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या असून, उर्वरित दोन जागा काँग्रेसकडे गेल्या आहेत़ मात्र मानसिंगराव नाईक यांच्या घराण्यातील मोठा गट भाजपमध्ये गेला आहे़ परिणामी दोन जागाही ताब्यात ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे़


शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील आऱ आऱ पाटील, जयंत पाटील, पृथ्वीराज देशमुख, अनिल बाबर, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, मानसिंगराव नाईक, मदन पाटील, दिनकर पाटील अशी मोठी फौज राष्ट्रवादीमध्ये गेली होती़ राज्यात आघाडीची सत्ता आल्यानंतर जयंत पाटील आणि आऱ आऱ पाटील यांच्याकडे महत्त्वाची मंत्रीपदे होती़ विधानपरिषद आणि विधानसभा आमदारांचे मोठे संख्याबळही पक्षाकडे होते़ त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणात २००२ ते २०१७ पर्यंत राष्ट्रवादीचा दबदबा राहिला आहे़
बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व राखले होते़ मात्र मे २०१४ मध्ये लोकसभा आणि आॅक्टोबर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादीतील कडेगाव व पलूस तालुक्याचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, जतचे आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील हे दिग्गज नेते भाजपमध्ये, तर आ. अनिल बाबर शिवसेनेत गेले़ त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेत्यांची मोठी पोकळी निर्माण झाली आहे़


नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची मोठी फौजही भाजपमध्ये गेली. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत किंगमेकर ठरलेले आणि तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० जागा ताब्यात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आऱ आऱ पाटील यांचेही निधन झाले आहे़ यामुळे राष्ट्रवादीकडे सध्या नेत्यांचा तुटवडा आहे़
२०१२ ते २०१७ या पाच वर्षात राष्ट्रवादीमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या.अर्धा डझन वजनदार नेते भाजपमध्ये दाखल झाले़ खानापूर-आटपाडी तालुक्याचे आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे यंदाची जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादीसाठी आणि जयंत पाटील यांच्यासाठी खडतर ठरणार आहे़

Web Title: How can prevent Jayantra from falling NCP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.