मुश्रीफ साहेब माझ्यावेळीच हिमालय वितळतोय कसा?, बाबासाहेब पाटील यांची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 04:04 PM2022-10-08T16:04:57+5:302022-10-08T16:05:42+5:30
‘बाबासाहेब तुम्हाला लहानाचा मोठा मीच केला, आमदारकीला उभे केले. सहकारी संस्था व इतर राजकारण वेगळे असते, काही ठिकाणी तडजोडीची भूमिका घ्यावी लागते.
पोर्ले तर्फ ठाणे : जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीच्या निवडणुकीत सातत्याने आपल्यावर अन्याय झाला, मुश्रीफ साहेब इतरांच्या पाठीमागे तुम्ही हिमालयासारखे राहता, मग माझ्या वेळीच हा हिमालय वितळतोय कसा, अशी विचारणा जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी शुक्रवारी मेळाव्यात केली. ‘बाबासाहेब तुम्हाला लहानाचा मोठा मीच केला, आमदारकीला उभे केले. सहकारी संस्था व इतर राजकारण वेगळे असते, काही ठिकाणी तडजोडीची भूमिका घ्यावी लागते, असे असले तरी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी तुमच्या मागे ताकद उभी करू,’ असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पन्हाळा-शाहूवाडीचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी स्वागतामध्ये बाबासाहेब पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. हाच धागा पकडून बाबासाहेब पाटील म्हणाले, बाजार समितीला आमच्या विरोधकांना पाच जागा दिल्याने आमचे खच्चीकरण झाले. ‘गोकुळ’ला संधी दिली नाही, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही उमेदवारी कापली, यामुळे पन्हाळा, शाहूवाडीतील पक्ष कमकुवत होत आहे. सगळ्यांच्या मागे तुम्ही हिमालयासारखे असता, मग माझ्यावेळीच हा हिमालय का वितळतोय?
यावर आमदार मुश्रीफ म्हणाले, बाबासाहेब पाटील यांना दत्त-आसुर्ले कारखान्याचा अध्यक्ष करणे, त्या कारखान्यास अर्थसाहाय्य करण्याची भूमिका आपणच घेतली. जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत मार्केटिंग प्रोसेसिंगमधून संधी दिली. यावेळेला बँक बिनविरोध करण्याची भूमिका घेतली, पण त्यामध्ये बाबासाहेब पाटील हे अडसर होते. त्यांना थांबवले नाहीतर आमदार चंद्रकांत पाटील, प्रकाश आवाडे, विनय काेरे, प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके हे दुसरे पॅनेल करणार होते. हे टाळण्यासाठी बाबासाहेबांना स्वीकृत म्हणून घेण्याचा निर्णय घेतला.
बाबासाहेब तुम्हाला ‘त्या’ संस्था माहिती होत्या का?
बँकेच्या मागील निवडणुकीत बाबासाहेबांना मार्केटिंग प्रोसेसिंगमधील संस्था कोठे होत्या हे माहिती नव्हत्या. मीच काढलेल्या संस्था बाबासाहेबाच्या ताब्यात दिल्या आणि हा गडी संस्थाच घेऊन गेल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला.